प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन, हैदराबादमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजन विश्वाला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबादर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निशिकांत गेल्या अनेक दिवसांपासून यकृतासंबंधित आजाराने त्रस्त होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर होती. पण गेल्या आठवड्यात अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

'डोंबिवली फास्ट' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला होता. 'दृश्यम', 'मुंबई मेरी जान', 'मदारी', 'फोर्स' हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. मराठीतही त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. 'डोंबिवली फास्ट', 'लय भारी', 'फुगे', हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.

दिग्दर्शना बरोबरच त्यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली आहे. 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली-२', 'भावेश जोशी' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने मराठी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

संबंधित पोस्ट