
बारवी धरण क्षेत्र परिसरातील गावांना सावधगिरीचा इशारा
- by Reporter
- Aug 14, 2020
- 1362 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणात पाण्याचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाणलोट क्षेत्रात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे नदी काठाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाश्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात महामंडळाच्या उप अभियंत्यांनी आस्नोली, राहटोली, चोण, सागांव, पाटील पाडा, चांदप, पादीर पाडा, पिपळोली, कारंद, चांदप पाडा या गावच्या सरपंचांना तातडीचे पत्र धाडले आहे. बारवी धरणातुन विसर्गाबाबत या पत्राद्वारे जिल्हाधिकारी, केडीएमसी आयुक्त, भिवडी-निजापूर महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर, कल्याण, मुरबाडचे तहसीलदार, जांभूळ व शहाड जल शुध्दीकरण केंद्रांचे उप अभियंता, पोलिस, आदींचेही लक्ष वेधण्यात आले आहे. बारवी धरणाच्या पाण्याची पातळी गुरुवारी दिनांक सकाळी ८.३० वाजता ६७.४२ मीटर इतकी होती. यावर्षी गोडबोले स्वयंचलित गेट बंद करुन तलांक ७२.६० मीटर म्हणजेच ३४०.४८ दलघमी. क्षमतेने पाणी साठवण केली जाईल. धरणाच्या पाण्याची पातळी तलांक ७.६० मीटर आल्यावर धरणातून विसर्ग चालू करण्यात येणार आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे नदीच्या काठाच्या रहिवाश्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात यावा, असेही या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
रिपोर्टर