
चिंता वाढली :महाराष्ट्रातील ११हजार ९२० पोलिसांना कोरोनाची बाधा
- by Reporter
- Aug 14, 2020
- 1029 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आपला जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी १०० पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १४७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत ११ हजार ९२० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत १२४ पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या ११,९२० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १२३५ पोलीस अधिकारी आणि १०,६८५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ९ हजार ५६९ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 952 पोलीस अधिकारी आणि ८६१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात २२२७ कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये २७२ पोलीस अधिकारी आणि १९५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ पोलीस ऑफिसर आणि ११३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दरम्यान, १२ ऑगस्टला २६४ तर १३ ऑगस्टला ३८१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
रिपोर्टर