मुलुंडच्या पूर्व द्रुगती महामार्गावरून प्रवाशांच्या सोयीसाठी डबल डेकर बस सुरु

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर पहिल्यांदा बेस्टची डबल डेकर बस धावायला सुरुवात झाली आहे. बेस्टने गेल्या आठवड्यापासून मुंबईत कार्यालयात जाणाऱयांसाठी ही नवीन व्यवस्था सुरु केली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखावे तसेच एकाच फेरीत अधिक प्रवाशांना 

प्रवासाची संधी मिळावी यासाठी डबल डेकर बस पूर्व द्रुतगती महामार्गावरून सुरु करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना मुंबईतील कार्यालये व कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली परंतु बेस्टच्या बसेस शिवाय इतर प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यामुळे तसेच बेस्टमध्ये देखील २२ पेक्षा अधिक प्रवासी घेण्यात बंदी असल्यामुळे बस स्टॉपवर प्रवाशांच्या मोठया रांगा लागलेल्या दिसू लागल्या होत्या. कार्यालयीन प्रवाशांची गैरसोय होवू नये तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना एकाचवेळी प्रवास करता यावा व बस स्टॉपवरील गर्दी कमी व्हावी यासाठी बेस्टतर्फे डबल डेकर बस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड, भांडुप या परिसरातील प्रवाशांसाठी या डबल डेकर बस पहिल्यांदाच चालविल्या जात असून मुलुंड पूर्व, भांडुप पंपिंग स्टेशन येथून सायनपर्यंतच्या प्रवासासाठी या डबल डेकर बस बेस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या डबल डेकर बसमध्ये कोरोना संबंधित सुरक्षेचे सर्व नियम पाळून एकावेळी ४५ प्रवासी बसून व ५ प्रवासी उभ्याने प्रवास करायला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुलुंडहून मुंबईत कार्यालयात जाणाऱ्या प्रवाश्याची उत्तम सोय झाली आहे.

संबंधित पोस्ट