
कोरोना काळात देखील मुलुंडकरांच्या सेवेसाठी उभे ठाकलेले डॉ कुशल सावंत, मुलुंडकरांचे देवदूत
- by Reporter
- Aug 14, 2020
- 320 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड म्हाडा काॅलनीतील डाॅ.कुशल सावंत यांनी कोरोना काळात परिसरातील जनतेची जी सेवा केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाची भीती न बाळगता दिवसरात्र दोन्ही वेळेत आपला दवाखान्यात उपस्थित राहून आजारी रुग्णांवर उपचार करताना त्यांना धीर देण्याचे व योग्य काळजी घेतली, शासकीय नियमांचे पालन केले तर कोरोनाला न भिण्याचे सांगून रुग्णांचे मनोधर्य वाढविण्याचे महत्वाचे कार्य गेल्या १४५ दिवसांपासून डॉ कुशल सावंत यांनी केले आहे. अत्यंत अल्प दरात रुग्णांवर उपचार करताना आपल्याकडे आलेला रुग्ण लवकरात लवकर बरा होवून तंदुरुस्त कसा होईल याचकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
सर्दी ताप, खोकला, अंगदुखी, मलेरिया व इतर अनेक आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण सकाळी १० वाजल्यापासूनच त्यांच्या दवाखान्यात गर्दी करून असतात. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्या दवाखान्यातील रुग्णसंख्या कोरोना काळात देखील कमी होत नव्हती. पुन्हा संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉ कुशल सावंत हजर असायचे. कित्येक कोरोना रुग्णांना देखील ते आपली सेवा देत असून, त्यांच्याकडे उपचार घेतलेल्या सर्वच कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता देखील पडली नाही. फक्त डॉक्टरांच्या औषधोपचारांनी हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. काही कारणांमुळे दवाखान्यात येणे शक्य नसलेल्या अनेक रुग्णांना त्यांनी फोनवर मोफत वैद्यकीय सल्ला दिला आहे.
मुलुंडमध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बहुतेक खाजगी दवाखाने बंद होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाला व खाजगी दवाखाने टाकून बसलेल्या अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून घरी राहणे पसंद केले त्यामुळे अनेक रुग्णांची अवस्था बिकट झाली होती. आजाराच्या उपचारासाठी खाजगी दवाखाने बंद असल्यामुळे करायचे काय, कुठच्या डॉक्टरांकडे जायचे हा प्रश्न मुलुंडकरांना सतावत असताना म्हाडातील डॉ कुशल सावंत हे देवदूतासारखे मुलुंडकरांच्या सेवेसाठी कोरोनाला न भिता उभे राहिले. डॉ कुशल सावंत यांचाच एकमेव दवाखाना मुलुंडकरांची सेवा करण्यासाठी दिवसातील दोन्ही वेळेत उघडा असायचा. आजारी महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, लहान मुले, इत्यादी सर्व रुग्णांवर डॉ कुशल सावंत औषधोपचार करून बरे करत होते. इतर डॉक्टरांच्या भरमसाठ फी समोर सेवेचे व्रत घेतलेले डॉ कुशल सावंत, गरीब असो वा श्रीमंत सर्व प्रकारच्या रुग्णांना अत्यंत अल्प दरात औषधोपचार करण्याचे महान कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. अत्यंत मितभाषी व नम्र स्वभावामुळे तसेच आजारी रुग्णांना योग्य उपचार पद्धतीने तातडीने बरे करण्याच्या हातखंडामुळे डॉ कुशल सावंत मुलुंडमध्ये अतिशय लोकप्रिय झाले असल्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तीदेखील आजारपणात उपचारासाठी डॉ कुशल सावंतच्या दवाखान्याची पायरी चढताना आढळले आहेत.
रिपोर्टर