
महावितरणने खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक व प्रवासी हैराण
- by Reporter
- Aug 13, 2020
- 814 views
मुलुंड (शेखर भोसले) : सुमारे १५ दिवसांपूर्वी महावितरणने केबल टाकण्यासाठी खोदलेला भांडुप सोनापूर बसथांब्या जवळील एक रस्ता, केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही व्यवस्थितपणे बुजविण्यात न आल्याने येथून रहदारी करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम चालू असल्याने तेथील रस्ता आधीच अरुंद झाला आहे त्यातच महावितरणने केबल टाकण्यासाठी खोदलेला रस्ता घाईघाईत बुजवल्याने तो रस्ता ओबढधोबड झाला आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना तेथून वाहन चालविताना अडचण येत असून परिणामी तेथे वाहतूक जाम होताना दिसत आहे. तसेच बाजूलाच बस स्टॉप असल्यामुळे प्रवाश्याना देखील तेथून चालणे कठीण झाले आहे.
रस्ता घाईघाईत बुजवून महावितरणने रस्ता सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडे बोट दाखवले आहे. रस्ता सुरळीत करून त्यावर डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी पालिकेच्या एस विभागाकडे जमा
करण्यात आला असून यापुढे रस्ता सुरळीत करण्याचे काम महापालिकेच्या एस विभागाचे आहे, असे सांगत महावितरणने हात झटकले आहेत. पालिकेच्या एस विभागाच्या अधिकाऱयांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी माहिती देणे टाळले. परंतु रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक व वाहनचालक मात्र हैराण झाले आहेत.
रिपोर्टर