महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर, २०२० रोजीची परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जाणार
- by Reporter
- Aug 13, 2020
- 620 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर, २०२० रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परिक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली. अखेर २० सप्टेंबर, २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेवून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले.
रिपोर्टर