मुलुंड पूर्व येथील विद्यालय मार्गावर असलेल्या रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे आणि गव्हाचे वाटप

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील विद्यालय मार्गावर असलेल्या टेकचंद पन्नालाल जी जैन रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे गहू आणि डाळ मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून अनेक शिधापत्रिका धारकांना या दुकानातून  कमी प्रतीचा, हलक्या दर्जाचा गहू आणि तूरडाळ येथून नियमितपणे वितरित करण्यात येत आहे असे आढळून आले आहे.

शिधावाटप दुकान क्र U-mum ३५-E-०५८ हे टेकचंद पन्नालाल जी जैन या नावाने निलेश बिल्डिंग, विद्यालय मार्ग, मुलुंड पूर्व येथे रेशन दुकान असून येथे निकृष्ट दर्जाच्या गहू व तुरडाळीचे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार शिधापत्रिका धारक मधुरा पालव या गव्हाणपाड्यात राहणाऱ्या महिलेने केली असून ह्या दुकानात तूरडाळ, गहू हे नेहमीच घाणेरडे मिळतात. सरकार पाठवत असलेले चांगले गहू आणि डाळ ह्यांचा काळा बाजार होतो आहे असा आरोप मधुरा पालव यांनी केला आहे.

दुकानमालकाशी याबाबत संपर्क साधला असता सरकारकडून जे गहू आणि तूरडाळ येतात तेच ग्राहकांना वाटण्यात येते असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. शिधावाटप अधिकाऱयांना याबाबतीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. परंतु कोरोना काळात शासनाकडून येणारे चांगल्या प्रतीचे धान्य शिधापत्रिका धारकांना मिळत नसून निकृष्ट दर्जाच्या,  हलक्या प्रतीचे धान्य ग्राहकांना देवून शिधावाटप दुकानदार ग्राहकांना लुबाडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून अश्या अनेक तक्रारी सातत्याने ऐकायला मिळत आहेत परंतु शिधानियंत्रक अधिकारी मात्र या लबाड रेशन दुकानदारांवर काहीच कारवाई करत नसल्याचे आढळून येत आहे. 

संबंधित पोस्ट