पालिका अधिकाऱयांच्या निष्क्रीयतेमुळे लोकमान्य टिळक रोडवरील पदपथ दुरावस्थेत

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील स्टेशन समोरील लोकमान्य टिळक रोडच्या पदपथावरील पेव्हर ब्लॉक हे बहुतेक ठिकाणी निखळले असून सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिकांना येथून चालताना त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथील पेव्हर ब्लॉक निखळलेल्या अवस्थेत आहेत व अनेक नागरिकांनी यासंबंधीच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत परंतु पालिका अधिकाऱयांच्या निष्क्रियतेमुळे या पदपथाच्या दुरुस्तीसाठी काहीच कार्रवाई होत नसून तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या बहाण्याने निखळलेल्या पेव्हरब्लॉक खाली वाळू टाकून जात असल्याच्या तक्रारी येथील दुकानदारांनी व सामान्य नागरिकांनी केल्या आहेत.

लोकमान्य टिळक रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावरील पेव्हर ब्लॉक निखळलेल्या अवस्थेत असल्यामुळे तसेच तेथील काही पेव्हर ब्लॉक गायब झाले असल्यामुळे अनेक नागरिकांना तेथून चालताना त्रास होत आहे. वरखाली असलेल्या येथील पेव्हरब्लॉक मुळे अनेक जेष्ठ नागरिकांचे पाय मुरगळले आहेत तर काहीजणांचा तेथे पडल्याने अपघात झाला आहे. तसेच निखळलेल्या पेव्हरब्लॉक खाली जमा झालेले पावसाचे पाणी व चिखल तेथून चालणाऱ्या पादचाऱयांच्या अंगावर उडून कित्येकांचे कपडे देखील खराब झाले आहेत, असे येथील सामाजिक कार्यकर्ते दादा वाडेकर यांनी सांगितले.

पालिका इतर ठिकाणी चांगल्या अवस्थेत असलेले पेव्हर ब्लॉक काढून ६०:४० च्या धर्तीवर पदपथ दुरुस्त करत आहे परंतु या पदपथावरील पेव्हरब्लॉक अनेक ठिकाणी निखळले असल्याने पदपथ पूर्णतः दुरावस्थेत आहे त्यामुळे येथून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, परंतु असे असूनही हा पदपथ का दुरुस्त केला जात नाही, असा सवाल अनेक जेष्ठ नागरिकांनी संतप्त स्वरात विचारला आहे.

पालिकेच्या टी वॉर्डच्या दुरुस्ती खात्यातील अधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, 'मी एकदा तेथे जाऊन पदपथाची अवस्था बघून घेतो व नंतर काय करायचे ते वरिष्टांची बोलून निर्णय घेतो', असे सांगितले.

संबंधित पोस्ट