मुलुंड पूर्व स्थित मिठागर रोड येथील कोविड उपचार केंद्र बंद करण्याचा डाव

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील मिठागर रोडला असलेले पालिकेचे कोविड उपचार केंद्र बंद करण्याचा घाट घातला जात असून पालिका प्रशासनाकडून हा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुलुंड पश्चिमेला रिचर्डसन अँड क्रुडास या बंद कंपनीच्या मोकळ्या जागेवर १६०० बेडचे जम्बो कोविड सेंटर करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आल्याने व सध्या तेथे अत्यंत कमी संख्येने कोरोनाबाधित रुग्ण संख्या असल्याने मुलुंड पूर्वचे मिठागर रोड येथील सुस्थितीत असलेले कोविड सेंटर बंद करण्याचा विचार पालिका प्रशासनाने केला असल्याचे समजले.

मिठागर स्थित हे कोविड सेंटर योग्य प्रकारे चालू असून तेथील उपचार पद्धत देखील खूप चांगली आहे त्यामुळे अनेक रुग्ण कमी कालावधीत बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु कमी खर्चाचे हे कोविड सेंटर बंद करून कोरोनाबाधित रुग्नांना संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या व निम्मे बेड ऑक्सिजन युक्त असलेल्या रिचर्डसन अँड क्रुडास येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या येथे फक्त १२५ रुग्णच उपचार घेत आहेत परंतु १६०० बेडच्या हिशोबाने महानगर पालिकेला खर्चाचा अधिकचा भार सहन करावा लागत असल्याने त्याचा भूर्दंड सामान्य जनतेलाच सोसावा लागणार आहे. याचसाठी आमदार मिहीर कोटेचा यांनी मिठागर स्थित कोविड सेंटर बंद करण्याला विरोध दर्शवला आहे.

टी वॉर्ड पालिका प्रशासन, येथील आरोग्य खात्यातील अधिकाऱयांकडे यासंदर्भात अधिक माहितीसाठी विचारणा केली असता कोणीही यावर बोलायला तयार झाले नाहीत

संबंधित पोस्ट