पार्थ पवारांचं जय श्रीराम ते सीबीआय,शरद पवारांनी त्यांच्याबद्दल इतकी टोकाची प्रतिक्रिया का दिली?
- by Adarsh Maharashtra
- Aug 12, 2020
- 1462 views
मुंबई, १२ ऑगस्ट :सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाची घोषणा होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला.
तत्पूर्वी, म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली मावळची जागा खुद्द शरद पवार लढवणार हे जवळपास सगळ्यांनीच निश्चित मानलं होतं. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्याप्रमाणे तयारी देखील चालवली होती. मात्र, त्याचवेळी पवार कुटुंबातली तिसरी पीढी असलेल्या पार्थ पवार यांना देखील राजकारणात उतरवण्यासाठी खुद्द अजित पवार आग्रही असल्याचं आणि त्यांच्यासाठी मावळ मतदारसंघच योग्य असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं. ‘एका कुटुंबात एकाच व्यक्तीला उमेदवारी मिळावी’, अशी भूमिका शरद पवारांनी जाहीर करून देखील पार्थ पवारांसाठीचा अजित पवारांचा हट्ट काही कमी होताना दिसत नव्हता. अखेर थोरल्या पवारांनीच माघार घेत मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडली आणि आपण निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. काका-पुतण्यामध्ये विसंवादाची पहिली सुरुवात तिथूनच झाल्याचं दिसू लागलं.
पार्थ यांच्या अवतीभवती असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, पार्थ हे राम मंदिराच्या बाजूने असलेल्या लोकभावनेचा आपण आदर करतो हे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हा दावा पोकळ वाटतो. पार्थ हे राजकारणातील त्यांचे ‘गॉडफादर’ अर्थात त्यांचे पिताश्री अजित पवार यांच्या इशाऱ्याखेरीज अशी वक्तव्ये करणार नाहीत. शरद पवार यांच्या वक्तव्याशी सुसंगत अशी विधाने रोहित पवार हे वरचेवर करताना दिसतात तर पार्थ हे अजित पवार यांना जी वक्तव्ये जाहीरपणे करणे शक्य नाहीत ती करतायत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच कुजबुज आहे.
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम