नाला साफ न केल्याने अशोकनगर परिसरात नाल्याचे घाण पाणी शिरले घरात
- by Reporter
- Aug 12, 2020
- 1209 views
मुलुंड (शेखर भोसले) : आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे मुलुंड पश्चिम येथील अशोकनगर परिसरातील अलिबहादूर चाळीत नाल्याचे पाणी भरल्याने चाळीतील घरात नाल्याचे पाणी घुसले आहे. घरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. काहींचे वापरातील कपड्यांचे नुकसान झाले तर काहींच्या घरातील बिछाने गटाराच्या पाण्यामुळे खराब झाले. घरात नाल्याचे पाणी शिरल्याने इतर सामानांचे देखील नुकसान झाले असून या घाण पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुलुंड पश्चिमेतील रिद्धीसिद्धी परिसरातून वाहणाऱ्या मोठया नाल्याची पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे सफाई झाली नसून अशोकनगर परिसरातील भूमिगत नाले देखील कित्येक वेळा तक्रार करूनही पालिकेने
साफ केले नाही आहेत त्यामुळे थोड्याश्या पावसात देखील अशोकनगर परिसरातील चाळीतील भूमिगत नाले तुडूंब भरून वाहत आहेत. आज देखील सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे येथील अलिबहादूर चाळीतील भूमिगत नाला तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात नाल्याचे घाण पाणी घुसून कित्येंकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या घाण पाण्यामुळे परिसरातील आबालवृद्ध आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येथील नाल्यावरील चेंबर्सची काही झाकणे मोडकळीस आली आहे तर काही झाकणे गायब आहेत. स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना अनेकवेळा यासंदर्भात तक्रार करण्यात आल्या परंतु त्यांच्यामार्फत काहीच कारवाई होत नाही आहे. टी वॉर्डचे पालिका अधिकारी देखिल येथील नाल्याच्या साफसफाई लक्ष देत नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून जर नगरसेवकांनी आणि पालिका अधिकाऱयांनी लवकरात लवकर येथील नाले साफसफाई केली नाही आणि नाल्यावरील झाकणे बसवून दिली नाही तर भविष्यात स्थानिकांच्या असंतोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागू शकतो, असे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उमेश खरात यांनी सांगितले आहे.
टी वॉर्डच्या पालिका अधिकाऱयांना याबाबतीत विचारले असता नाल्याची साफसफाई लवकरच करण्यात येईल असे सांगितले.
रिपोर्टर