आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आघाडी सरकारने सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- by Reporter
- Aug 12, 2020
- 787 views
मुंबई (श्रीराम कांदू) : मुंबईतील धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना भयानक आहे. मुली, महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयश आल्याने महाआघाडी सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
श्रीमती वाघ म्हणाल्या की, कोरोना महामारीशी सामना करत असताना राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचारांच्या घटनांतही मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याआधी वर्धा, रोहा, चंद्रपूर, पुणे, जळगाव या ठिकाणीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. विलगीकरण केंद्रातही महिला सुरक्षित नाहीत. माध्यमांतून वारंवार या घटना समोर येत असताना राज्य सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. महिला सुरक्षे संदर्भात संवेदनहीन असलेल्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही.
सत्तेवर आल्यावर गृहराज्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत ‘दिशा’ कायद्यांची चर्चा केलेली. मात्र ही चर्चा केवळ कागदावरच राहिली आहे. कोणतेही प्रश्न आल्यावर सरकार कोरोना संकटाचे निमित्त पुढे करते. या काळात अनेक शासकीय निर्णय घेतले गेले. मग महिला सुरक्षे संदर्भात निर्णय घेण्यास एवढी दिरंगाई या सरकारकडून का केली जाते आहे असेही चित्रा वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे.
रिपोर्टर