१५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा अन्यथा... प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारला इशारा

नागपूर (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे आज राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती. राज्य सरकारने १५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवेला परवानगी द्यावी, आंतर जिल्हा वाहतूक सुरू करावी. नाही तर आमचे कार्यकर्ते त्यासंदर्भातले बंधने मोडून काढतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आज नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोरभवन बस स्थानकाच्या समोर डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करावी तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा आणि ऑटोच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीला परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे एक तास डफ आणि बँड वाजवून लोकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारने खाजगी वाहतूकदारांना वाहतुकीची परवानगी दिली असून ते सामान्य जनतेची लूट करतायेत असा आरोपही आंबेडकर यांनी केला

सरकारने एसटी सेवेला परवानगी दिली असती तर ही लूट झाली नसती, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी वाहतूकीला अडथडा तर निर्माण केलाच, सोबतच सोशल डिस्टनन्सिंग नियमांची ही ऐशीतैशी केली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते मास्क न घालताच आंदोनलात सहभागी झाले होते. त्यामुळे एका बाजूला सामान्य नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले.

संबंधित पोस्ट