मुलुंड पश्चिमेकडील नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
- by Reporter
- Aug 12, 2020
- 618 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिमेकडील ब्रिजलाल माणिक अस्तिक या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेच्या टी वॉर्डने ४५ दिवसांपूर्वी नव्याने बनविण्यात होता परंतु गेल्या काही दिवसातील पावसाने या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेले आढळून येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातील रस्ता शोधत मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून त्यातील काही खड्डे अर्धा फूट खोल असल्याने वाहनाचालकांना तसेच प्रवाश्याना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
काही वाहनचालकांनी यासंदर्भात तक्रार करताना सांगितले की, रिक्षा किंवा दुचाकीने येथून प्रवास करताना वाहन खड्ड्यात आपटून वाहनांचे देखील नुकसान होत आहेच परंतु खड्ड्यात वाहन उडाल्याने पाठीच्या मणक्यांना देखील त्यामुळे त्रास होत असल्याने शारीरिक नुकसान देखील होत आहे. रस्त्याच्या दुतर्फ़ा राहणाऱ्या नागरिकांनी देखील या खड्ड्यात वाहने आपटत असल्याने होणाऱया सततच्या आवाजाने तसेच खड्ड्यात साचलेले पाणी उडाल्याने भयंकर त्रास होत असल्याचे सांगितले. हा रस्ता नुकताच नव्याने बनविण्यात आला परंतु कंत्राटदाराने दुय्यम प्रतीचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविला असून संबंधित पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या संगनमताने कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामातील मलई खाल्ली असावी आणि म्हणूनच काही दिवसातच हा रस्ता खड्डेमय झाला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पालिका अधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
रिपोर्टर