गणेशोत्सव आरोग्य शिबीर आयोजित करून साजरा करा,महापौरांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून यंदा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशभक्तांना केले आहे.शिवसेना उपनेते, मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे  विनोद घोसाळकर यांनी शिष्टमंडळासह महापौरांसोबत केलेल्या चर्चेत हे आवाहन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात काय उपाययोजना करता येतील याविषयी महापौरांनी आढावा घेतला. त्यानुसार गणेशोत्सव मंडळाना सूचना करण्यात येणार आहेत. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी घरगुती गणेशोत्सव विसर्जन करताना गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला एक वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे. दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. दरम्यान याठिकाणी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे २७ जुलै २०२० रोजी केली होती. त्यानंतर महापौरांनी तात्काळ याठिकाणी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी कॉम्प्युटर रूम इंटरनेट जोडणी रेस्टरूम करण्याची मागणी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती. तसेच जनरल स्टोर उपलब्ध करून पावसाळा लक्षात घेता काही ठिकाणी शेडची उभारणी करणे तसेच इंटेनसिव्हिस्ट व फॉरेन्सिक मेडिकल एक्सपर्टची नियुक्ती करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. या सर्व मागण्यांना महापौरांनी तात्काळ मंजुरी दिली आहे. महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात संयुक्त आयोजित केलेल्या सभेस विश्वास व्यं.शंकरवार उप-आयुक्त परिमंडळ-७, श्री. रमेश पवार महानगरपालिका सह आयुक्त सा. आरोग्य, डॉ. रमेश भारमल, संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये, श्रीमती संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त व अधिकारी उपस्थितीत होते.

संबंधित पोस्ट