
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
- by Reporter
- Aug 11, 2020
- 979 views
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती.
शिवसेनेच्या कोट्यातून ते मंत्री झाले होते. त्यांच्याकडे मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली. शिवाय ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
”शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील”, अशी प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे.
रिपोर्टर