कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता नवी अट, एसटी महामंडळाने घेतला अजब निर्णय
- by Reporter
- Aug 10, 2020
- 873 views
मुंबई (प्रतिनिधी) : १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड १९ ची चाचणी करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळाने काढला आहे. यामुळे ई पासचे ५०० रुपये वाचतील, पण कोविड१९ च्या टेस्ट साठी अडीच हजार मोजावे लागणार आहेत. एकंदरीत दोन्ही बाजूने कोकणात जाणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, असा आरोप एसटी महामंडळाच्या या निर्णयानंतर केला जात आहे.
नेमका काय आहे निर्णय?
१३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सदर बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. असे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.
६ ऑगस्ट पासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून आज अखेर तब्बल १० हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. योग्यरीत्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणी पिण्याचे पाणी व नैसर्गिविधी साठी वाहने थांबविण्याची दक्षता महामंडळाने घेतली असून प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
रिपोर्टर