गणेशोत्सवाबाबत केडीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर मंडळांनी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन----

डोंबिवली (श्रीराम कांदू) : कोवीडच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा प्रबोधनात्मक आणि आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले आहे. गणेशोत्सवाबाबत महापालिका अधिकारी, पोलिस आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्यांसोबत झालेल्या ऑनलाईन मिटींगमध्ये त्यांनी हे आवाहन करत विविध मार्गदर्शक सूचनाही केल्या.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना राबविण्यात येत असून त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (SOP) गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करणे बंधनकारक असल्याचेही पालिका आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.
     
या संदर्भात शासन तसेच केडीएमसीकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांकरीता गणेशमूर्ती ४ फुट आणि घरगुती गणेशाची मुर्ती २ फुटांची असावी. या अनुषंगाने मंडपांचा आकारही लहान असावा. मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/उपक्रम घेण्यात यावेत. सार्वजनिक मंडळांनी गणेश दर्शनासाठी शक्यतोवर ऑनलाईन, फेसबुक, इंटरनेट, केबल नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी. शासनाच्या सूचनांनुसार गणेश मंडपांमध्ये
निर्जंतूकीकरणाची, थर्मल स्क्रीनींगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येकाला मास्क परिधान करणे बंधनकारक करावे.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात महापालिकेच्या मदतीने फिव्हर कँम्प,ॲन्टीजेन टेस्ट आयोजित कराव्यात, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

विसर्जन आपल्या दारी उपक्रम : गृहनिर्माण संस्थांनी शक्यतोवर त्यांचे आवारामध्येच गणेश विसर्जनाची सोय करावी अथवा महापालिका राबवित असलेल्या विसर्जन आपल्या दारी या मोहिमेत महापालिकेने उभारलेल्या यंत्रणेकडेच आपले गणपती जमा करावेत, असे पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे आकडे कमी झालेले दिसत असले तरी नागरिकांनी उत्सवादरम्यान बाहेर पडू नये, गर्दी करु नये, अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. या ऑनलाईन मिटींगमध्ये महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी अशा मिळून ९९ जणांनी सहभाग घेतला होता.

संबंधित पोस्ट