
पालिका बी/सी/डी/ई विभागात अवैध बांधकामांना अधिकाऱ्यांचे अभय?
- by Reporter
- Aug 07, 2020
- 1163 views
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेकडून मुंबईत अवैध बांधकामावर धडक कारवाई होत असताना दक्षिण मुंबईतील बी-सी-डी-ई विभागात मात्र अशा बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी "डी" विभागातील अवैध बांधकामांबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रारही केली असल्याचे समजते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार "बी" विभागात प्रा.शेख हसन मार्ग येथे अनेक मजली बेकायदा बांधकाम कोरोनाच्या काळात झाले आहे.तर उभ्या राहिलेल्या काही टॉवरचे बांधकाम व तेथे पुरविण्यात आलेल्या नागरी सुविधा संशयास्पद वाटतात.नवरोजी हिल रोड क्र.१ येथील पालिका मालकीच्या जागेतील पत्राशेड एकमजली पक्या बांधकामात उभ्या राहिल्या आहेत. तसेच नवरोजी हिल रोड क्र.११ डी या ठिकाणी असणाऱ्या पालिकेच्या पत्राशेडचे रूपांतर अवैध बांधकामात झाले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी वास्तव्यास असणारे रहिवाशी कोण आहेत याचाच थांगपत्ता पालिकेस नाही. सारा रामभरोसे कारभार! नरसी नाथा स्ट्रीट याठिकाणी जुन्या बांधकामावर अवैध नवीन बांधकाम झाले आहे पालिका "डी" विभागात जोबनपुत्र कम्पाऊंन्ड, लँमिग्टन रोड येथील रावल इमारत,एम एस अली रोड,नेपीयनसी रेस्टॉरंटसमोर, पालिका "ई" विभागात रामचंद्र भट मार्गावर, जे.जे.रुग्णालयाच्या गेट क्र १ येथील संरक्षक भिंतीलगत पत्राशेडच्या जागी अवैध पक्की बांधकामे उभी राहिली आहेत. पालिका क्षेत्रात जुन्या बांधकामावर अवैध बांधकाम केल्यामुळे इमारती कोसळून जीवीत व वित्तहानी झाली आहे असे असताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश असतानाही अवैध बांधकामे उभी रहात आहेत व पालिकेचे अधिकारी अशा अवैध बांधकामांना लक्ष्मीबंधनात अडकून अभय देत आहेत.
विशेष म्हणजे पालिका ए/बी/सी/डी/ई प्रभागातील कित्येक हाऊसगल्यांमध्ये अवैध बांधकामे असून अशा अवैध बांधकामांना वीज-पाणी-परवाने वितरित केले गेले आहेत त्याचबरोबर विकास निधीतून अवैध बांधकाम असणाऱ्या हाऊसगल्यांची बांधकामे न हटविता अर्थपूर्ण संबंधाने पालिकेकडून दुरुस्ती करून दिली जाते.याबाबत ज्येष्ठ समाजसेवक दिपक शिरवडकर, मुंबादेवी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रविण ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली
रिपोर्टर