
नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
- by Reporter
- Aug 06, 2020
- 504 views
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर दर दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत.त्यातच सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल केला होता. तिच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा खळबळजनक आरोप राणेंनी केला. मंगळवारी राणेंनी असा आरोप केला आणि बुधवारी मुंबई पोलिसांच्या मालवणी पोलीस ठाण्यामार्फत दिशा सालियन आत्महत्येचा सखोल तपास आणि संबंधित बाबींची शहानिशा करण्यासाठी लेखी व इतर पुरावा किंवा अधिक माहिती देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस संबंधित पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यामुळे मुंबई पोलिसांना राणेंनी केलेल्या आरोपानंतर जाग आली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिशा सालियन हिच्या मृत्युसंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली असून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास मालवणी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात सोशल मिडिया, वृत्तपत्र, वृत्तवाहिनीद्वारे विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्या अनुषंगाने कोणतीही लेखी व इतर पुरावा किंवा अधिक माहिती देऊ इच्छीत असल्यास पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरून या प्रकरणाचा सखोल तपास व संबंधित बादींची शहानिशा करणे शक्य होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दिशा सालियन हिची हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाल्याने वेगवगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल केला आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे. त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत आहे असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशाचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप राणेंनी केला, त्यामुळे दिशा सालियन आत्महत्येला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मालवणी पोलिसांनी केलेल्या आवाहनाबाबत आमदार नितेश राणे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, जर दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टेम अहवालात तिच्या शरीराच्या खाजगी भागास जखमा असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर त्याबाबत पोलिसांनी तपास करावा. इतर पुराव्यांची त्यांनी आवाहन करण्याची आवश्यकता नाही असं नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रिपोर्टर