
मुनियाच्या हत्येनंतर मटका किंग कोण ?
- by Adarsh Maharashtra
- Aug 06, 2020
- 1276 views
कल्याण(श्रीराम कांदू)कल्याण डोंबिवलीत सोशल क्लबच्या पडद्याआड मटक्याचे गोरखधंदेही चालतात हे मटका किंग मुनिया अर्थात जिग्नेश ठक्कर याचा प्रतिस्पर्धी टोळक्याने काटा काढल्यानंतर उघड झाले आहे. जवळपास डझनभर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या या गुंडाचे सोशल क्लबच्या नावाखाली मटक्याचे धंदे बिनबोभाट सुरू असताना मृत्यूनंतर त्याचा वारसदार कोण ? यावरून लोकल अंडरवर्ल्डमध्ये कुजबुज सुरू झाली आहे.
मुनियाला अगदी जवळून गोळ्या झाडणारा जयपाल उर्फ जापान डुलगज पोलिसांच्या हाती लागला आहे. जयपाल उर्फ जापान हा मुनियाचा प्रतिस्पर्धी धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर आहे. त्याच्या तोंडून अनेक गुपिते बाहेर पडणार आहेत. बाबू जेठवा उर्फ बाबू याला जिग्नेश याने धर्मेश उर्फ नन्नू शाह याला मारण्याची सुपारी दिली होती, असे अटक केलेल्या जपान याने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे आम्ही मटका किंग मुनियाची हत्या केल्याची माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कल्याण-डोंबिवली शहरात 80 च्या दशकापासून गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व राखण्यासाठी अनेक नामचीन गँगस्टरमध्ये एकमेकांवर जीवघेणे हल्ले होत आले. अनेक गुंड टोळ्यांनी एकमेकांना संपविले. एकीकडे अनेक गुंडांचा खात्मा झाल्याने पोलिसांची डोकेदुखी परस्पर संपुष्टात आली. तर दुसरीकडे अंडरवर्ल्ड वॉर संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांना एन्काऊंरचे शस्त्र उपसावे लागले. 1980 च्या दशकापासून अनेक कुप्रसिद्ध गुंडाना पोलिसांनी एन्काऊंटर करून यमदासी धाडले. यातील मंचेकर टोळीचा म्होरक्या सुरेश धनाजी मंचेकर याला एन्काऊंटर स्पेशालिस्ट रविंद्र आंग्रे यांनी कोल्हापूरात जाऊन ढगात पाठवले. मंचेकरचा उजवा हात मानला जाणारा उदय मांजरेकर, राजेश नाडकर्णी, दीपक मेघाणी, देवेंद्र कारेकर, अमित गायचोर, गणेश पाटील, बंगाली, कराटे फायटर अशोक घाऱ्या, तर दाऊद टोळीतील भास्कर शेट्टीसह आणखी एकाला यमसदनी धाडणाऱ्या तत्कालीन एन्काऊंटर स्पेशालिस्ट दत्ता घुले यांचे नाव घेतले जाते. 1996-97 च्या दशकात उन्मत्त झालेल्या अश्विन नाईक टोळीतील कस्तुरी अण्णा मद्रासी याच्यासह दाऊद टोळीतील खंडणीबहाद्दर शूटरची विकेट काढली. अशा गुंड आणि त्यांच्या कंपन्यांना प्रोटेक्शन मनी देणाऱ्या स्थानिक तथाकथित बिल्डर, मटका माफिया, मटक्याच्या चिठ्ठ्या इकडून-तिकडे ने-आण करणाऱ्या जवळपास सगळ्याच गुंडांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बुरखा पांघरला आहे. 1999-2001 नंतर एन्काऊंटर बंद झाले तसे स्थानिक पातळीवरील गुंडांनी आपापले गोरख धंदे बंद केले आणि या गुंडांनी राजकारणात शिरकाव केला. त्यात मटका किंग मुनियाचाही समावेश होता. बालपणीपासून एकमेकांचे मित्र पण गुन्हेगारी विश्वात वर्चस्व तथा आर्थिक वादामुळे एकमेकांचे हाडवैरी झालेले धर्मेश शहा आणि जिग्नेश ठक्कर हे या पूर्वी दोघेही खंडणीच्या एका गुन्ह्यात सहआरोपी आहेत. आपल्यावर असलेल्या गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी जीग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याने एका राजकीय पक्षाचा बुरखा धारण केला होता. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा कथित अध्यक्ष जिग्नेश ठक्कर हा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मिरवला होता.
तर दुसरीकडे मटका किंग मुनियाच्या हत्येतील मुख्य गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहा हा एकेकाळी छोटा राजन कंपनीमधील टॉपचा शार्प शुटर समजला जायचा. धर्मेश उर्फ नन्नू हा 1980 च्या दशकापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात असून याच्या नावावर याच्याविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपूर्वीच मटका किंग मुनिया हा धर्मेश उर्फ नन्नू याच्या छत्रछत्रेत राहून गुन्हेगारी जगतात उदयास आला. मात्र अलीकडच्या काळात धर्मेश उर्फ नन्नू याच्याशी वेगळे होऊन मुनियाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बस्तान बसवून स्वतःच गुन्हेगारी क्षेत्रात हात-पाय पसरायला लागला. त्यातच तो मटका किंग मुनीया या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात ओळखू लागला होता. त्यामुळे धर्मेश उर्फ नन्नू याच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकू लागली. गुन्हेगारी क्षेत्रातील वर्चस्व व आर्थिक वादातून मटका किंग मुनियाची शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला नीलम गल्लीत मोबाईलवर बोलत असतानाच चौघांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला. त्यामध्ये चार गोळ्या त्याच्या छातीत लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आणि मुनियाचे पर्व संपुष्टात आले. मुनियाच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार कोण, यावरून स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम