दुःखदायक:सलग 25 वर्ष आमदारकी शिवसेनेचे उपनेते तसेच माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

अहमदनगर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते.तर शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुत्र विक्रम राठोड आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनिल राठोड यांना आठ दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास झालेला होता ज्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, तपासणी दरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले होते. चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

   शिवसैनिकांचा 'अनिलभैया' गेला

अनिल राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.सहकार आणि साखर सम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची 'मोबाईल नेता' अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते 'भैया' नावाने प्रसिद्ध होते.

अनिल राठोड हे नगरमध्ये सुरुवातीला हिंदुत्ववादी संघटनांसाठी काम करत होते, हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा त्यांच्यावर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 1995 साली राठोड यांच्या गळ्यात पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली होती. त्यानंतर ते सलग पंचवीस वर्ष या शहराचे ते आमदार होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर त्यांना अन्न अन्नपुरवठा मंत्रीपद मिळालं होतं. लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अनिल राठोड यांनी कोरोना काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरु केले होते. या काळात गरजूंना शक्य होईल तशी सगळी मदत त्यांनी उपलब्ध करून दिली होती.

महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'अनिलभैय्या राठोड आयुष्यभर मा. शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान सैनिक राहिले. चांगला माणूस गेला, भावपूर्ण श्रध्दांजली !' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट