
घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा
- by Reporter
- Aug 01, 2020
- 840 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना प्रादुर्भाव आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापालिका आणि शासनातर्फे नागरिकांना सूचना करण्यात आल्यायत. यंदाचा गणेशोत्स अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलंय. तसेच गणेश मुर्ती, मंडप, मिरवणूक यात्रांवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोविड-१९ या साथ रोगाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि महानगरपालिकेचे या संबंधीचे धोरण लक्षात घेता, मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
गणपतीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांपेक्षा जास्त उंची नसावी यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे व घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. गणेशमुर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या गणेश विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन विसर्जनासाठी गर्दी करणे टाळून स्वतःचे व कुटुंबियांचे कोविड-१९ या साथ रोगाच्या प्रादुर्भावापासून रक्षण करता येईल.
गणेशोत्सव २०२० साजरा करतेवेळी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना पसंती द्यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान शिबीरे इत्यादी आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
रिपोर्टर