मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू
- by Reporter
- Aug 01, 2020
- 747 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ७ दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १०३२० नवे रुग्ण आढळून आलेत. तर २६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या तब्बल दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे २ लाख १४ हजार २८४ रुग्ण आहेत. त्यापैकी ८७ हजार ०७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर
६३५३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या १४ दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.

रिपोर्टर