सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले ....

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून गेले आहे. बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या राजकारणावरून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भा.ज.पा.ला फटकारून काढले आहे.

'अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भा.ज.पा.ला टोला लगावला आहे.


तसंच, 'या प्रकरणी पुरावे हे महत्त्वाचे आहे. जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे दिलेच पाहिजे. दोषींची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, पण या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये वाद निर्माण करण्यासासाठी करू नका' असंही उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना बजावलं आहे.

काही दिवसांपूर्वी  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे स्पष्ट केले होते की, 'या प्रकरणाचा तपास सी.बी.आय.कडे दिला जाणार नाही कारण तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत.'


त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  या वादामध्ये उडी घेतली. या प्रकरणाची चौकशी सी.बी.आय.ने करावी असं व्यापक जनमत आहे. पण, राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ई.डी.ने या प्रकरणी ई.सा.आय.आर. दाखल करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.


या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ई.डी.ने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.

तर दुसरीकडे भा.ज.पा. आमदार अतुल भातखळकर यांनीही 'या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास निष्पक्ष नाही.' असा आरोप केला होता.
दरम्यान भा.ज.पा.चे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सी.बी.आय.कडे सोपवावा अशी मागणी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करून त्याचा खून का झाला असावा याबाबत २६ मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधानांना पत्र लिहण्यापासून ते याप्रकरणातील गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी वकील नेमण्यापर्यंत सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्येचा छडा लावण्यासाठी विशेष जोर दिला आहे.

संबंधित पोस्ट