डोंबिवलीतील कोव्हीड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाची आत्महत्या केडीएमसीच्या सुरक्षा यंत्रणेचे उडाले धिंडवडे

डोंबिवली(श्रीराम कांदू) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत डोंबिवलीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलात कोव्हीड सेंटर सुरू केले आहे. मात्र तेथिल सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे उडाल्याची घटना तेथिल एका रुग्णाने केलेल्या आत्महत्येतून समोर आले आहे. गुरुवारी सकाळी या सेंटरमधून पळालेल्या रुग्णाचा मृतदेह पश्चिम डोंबिवली तील खाडीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.
रवी शंकर मोरे (53) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या बाजी प्रभू चौकात चावी बनविण्याचा व्यवसाय करणारे रवी मोरे हे पश्चिम डोंबिवलीच्या मोठा गाव-ठाकुर्लीतील शांताराम म्हात्रे चाळीत राहतात. पत्नी, 3 मुले व 1 लग्न झालेली मुलगी असा परिवार असलेले रवी मोरे हे कोव्हीड - 19 बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने त्यांना 20 जुलै रोजी पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलातल्या कोव्हीड सेंटर मध्ये दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्या नंतर त्यांना 8 दिवसांनी घरी पाठविण्यात आले. मात्र श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाल्याने पुन्हा त्यांना याच कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी मित्राला फोन केला. त्यानंतर मोबाईल तेथे ठेऊन ते सेंटरच्या बाहेर पडले. मुलगा रौनक मोरे हा वडिलांच्या मोबाईलवर सतत संपर्क करत होता. मात्र वडील प्रतिसाद देत नव्हते. म्हणून रौनक याने सेंटरशी संपर्क साधून वडील कुठे आहेत, याची माहिती विचारली. मात्र तेथिल कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे रौनक याने मानपाडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी क्रीडा संकुलातील सेंटरवर जाऊन चौकशी केली असता त्यांनाही रुग्ण रवी मोरे यांच्याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान बेपत्ता झालेल्या आपल्या वडिलांचा रौनक व त्याचे मित्र सर्वत्र शोध घेत होते. रवी मोरे यांनी खाडी किनारी फिरायला जाण्याची सवय होती. त्यामुळे रौनक व त्याचे मित्र मोठागावच्या खाडीकडे गेले. तेथे पोलिसांसह बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जवळ जाऊन मृतदेह पाहिला असता रौनक याने आपल्या वडिलांना ओळखले. या संदर्भात विष्णूनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली. त्यानंतर रवी मोरे यांच्या मृतदेहावर पाथर्लीच्या स्मश्यानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संदर्भात रौनक मोरे याने बोलताना गंभीर तक्रार केली आहे. कोव्हीड सेंटरमधून बाहेर पडलेल्या आपल्या वडिलांनी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुग्णाच्या नातेवाईकांना सेंटरमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत असतो. मात्र रुग्णाला सेंटरबाहेर पाठवतात कसे किंवा रुग्ण सेंटरच्या बाहेर जातोच कसा ? यावरून तेथिल व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप रौनक याने केला. शिवाय तेथिल स्टाफही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याचा आम्हाला अनुभव आल्याचे रौनक याने सांगितले. या संदर्भात कोव्हीड सेंटरशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे सेंटरची बाजू कळू शकली नाही.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट