
करोना मृतदेहावरील अंत्यसंस्कार मोफत पालिका प्रशासनाचा निर्णय
कल्याण डोंबिवली महानगरपालिका करोना मृतदेहावरील अंत्यसंस्कार मोफत करणार
- by Reporter
- Jul 27, 2020
- 422 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : करोना महामारीची लागण झाल्याने जीव गमवावा लागलेल्या नागरिकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहर अभियंता सपना कोळी, आरोग्य अधिकारी, आणि मालमत्ता विभागाच्या अधिकार्याशी चर्चा करून आयुक्ताच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे
कल्याण डोंबिवली शहरात करोनाने आतापर्यत ३०७ नागरिक मृत्युमुखी पडले असून करोनाची लक्षणे असलेले मात्र स्वबचा रिपोर्ट येण्या आधीच दगावलेल्या रुग्णाची संख्या देखील मोठी आहे. अशा रुग्णांचे मृतदेह देखील करोना रुग्णाच्या मृतदेहाप्रमाणेच संशयित करोना म्हणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून अंत्यसंस्कारासाठी धाडले जातात. या मृतदेहावर डीझेल किंवा गस शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. करोना काळात दररोज अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात असल्यामुळे या शवदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील वेळ मिळत नसून दुसरीकडे मृतदेहाला गुंडाळलेले प्लास्टिक शवदाहिनीला चिकटत असल्यामुळे यात वारंवार बिघाड होत आहे. यामुळेच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणार्या नातेवाइकाना दुसऱ्या स्मशानात मृतदेह नेण्यास सांगितले जात असल्यामुळे नातेवाइका मध्ये संतापाची भावना पसरते. यामुळेच वाढत्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर शवदाहिनी बरोबरच लाकडावर अंत्यसंस्काराला परवानगी देण्यात आली आहे. मात्र रुग्णालयातील वार्डबॉय हा मृतदेह सरणावर ठेवण्यासाठी देखील थांबत नाहीत. स्मशानात केवळ एकच कर्मचारी असल्यामुळे हा मृतदेह सरणावर ठेवणे कठीण होते. अनेकदा संबधित व्यक्तीचे नातेवाईक देखील करोनाने बाधित झाल्यामुळे विलगीकरणात असल्यामुळे ते अंत्यसंस्कारासाठी पोचू शकत नाहीत. तर सरणासाठी लागणारी लाकडे आणि इतर खर्चाचा प्रश्न उद्भवत असताना दुसरा कर्मचारी मदतीला देणे शक्य नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे होते .यामुळेच करोना किंवा संशयित करोना बाधित मृतदेह म्हणजे जे मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून अंत्यविधीसाठी धाडले जातील अशा सर्व मृतदेहाच्या अंत्यविधीचा खर्च पालिका प्रशासनाकडून उचलला जाणार आहे. स्मशानात सरणावर मृतदेह उचलून ठेवण्यासाठी किमान दोन व्यक्ती असाव्यात या व्यक्तींना लागणारे पीपीइ कीट,सुरक्षेची साधने तसेच मानधन देखील प्रशासनाकडून दिले जाणार आहे. तर अशा अंत्यविधीसाठी मृताच्या नातेवाईकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. स्मशान भूमीबाबत येणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठीच करोना मृतदेहावर दोन्ही प्रकारच्या अंत्यसंस्काराचा पर्याय उपलब्ध करून देत या अंत्यविधीचा सर्व उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले.
चौकट
पालिकेच्या केवळ रुक्मिणीबाई रुग्णालयात शवागर असून करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा मृतदेह इतर मृतदेहावर शवागृहात ठेवता येत नसल्यामुळे रात्री अपरात्री रुग्णाच्या नातेवाइकाकडे हा मृतदेह सोपविला जातो नातेवाईक नसतील तर रुग्णालयाचे वार्डबॉय हा मृतदेह स्मशानात नेतात. यामुळेच करोना रुग्णालयात रेडीमेड कॅबिनेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालिका प्रशासनाने ८ कॅबिनेट खरेदी करण्याची तयारी केली असून यामुळे हे मृतदेह मृत्यू झालेल्या रुग्णालयात रात्रभर ठेवणे शक्य होऊ शकेल.
रिपोर्टर