उल्हासनगर ची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल.पण भ्रष्टाचाराचा वायरस आधी रोखला पाहिजे !
- by Rameshwar Gawai
- Jul 26, 2020
- 1544 views
उल्हासनगर (रामेश्वर गवई) :उल्हासनगर महापा लिकेचे आयुक्त आणि त्यांची टिम कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.मात्र काही विभागातील अधिकारी आणि खाजगी हाँस्पिटल या आजारांच्या आड, ठेकेदारांच्या मदतीने भ्रष्टाचार करीत आहेत.कोरोना व्हायरस पेक्षा भ्रष्टाचाराचा व्हायरस अधिक घातक असल्याने .हा भ्रष्टाचाराचा व्हायरस रोखण्याचं आव्हान आयुक्त डाँ.राजा दयानिधी यांच्या समोर उभे ठाकले आहे.आयुक्त हे डॉक्टर असल्याने ते भ्रष्टाचार व्हायरसवर लस शोधून काढतील असा विश्वास नागरीकांना आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोनामुक्त ते हाॅटस्पाॅट कोरोनाग्रस्त अशी वाटचाल केली. प्रारंभी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोनावर मात करण्यात करण्यात कमालीचे यश मिळवले होते. गुरूद्वारांनी त्यांना तब्बल तीन महिने साथ दिली. त्यामुळे तीन महिने दररोज ७० ते ८० हजार लोकांना अन्नदान केले. परंतू सुधाकर देशमुख यांनी भ्रष्ट ठेकेदारांच्या नाड्या आवळल्याने या लाॅबीने त्यांची पनवेल महापालिकेत बदली करण्यात यश मिळवले. दरम्यान समीर उन्हाळे हे आयुक्त आले आणि महिनाभरात गेले.त्यांचे अस्तित्व जाणवलेच नाही. याच काळात उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त रूग्णांनी उच्चांक गाठला.
दोन आठवड्यापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी डाॅ.राजा दयानिधी या आयएएस दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती झाली. स्वतः डाॅक्टर असलेल्या आयुक्त दयानिधी यांनी अल्पावधीतच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला व सूत्रबद्धरित्या उपाययोजना आणण्यास प्रारंभ केला. अधिकारी,कर्मचारी,डाॅक्टर, पालकमंत्री,खासदार व लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय साधत त्यांनी प्रभावी उपाय योजना आखण्यास प्रारंभ केला. त्याचा अपेक्षित परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे.
आजचे चित्र आशादायक असे आहे.एकूण संक्रमित रूग्ण-६३७४ आहे. तर कोरोना वरील मात केलेल्यांची संख्या ४३३३ इतकी आहे.तर आजमितीस १९३२ इतके रूग्ण उपचार घेत आहेत. टक्केवारीचा विचार केला तर रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ६३ .८३ इतका आहे.तर मृत्यूचे दर १ .६५ इतका आहे. आज संक्रमित १९३२ रुग्णांपैकी ३३ .१६ % रूग्ण होम आयसोलेशनमधे आहेत. तर काही रूग्ण उल्हासनगरच्या बाहेरील रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचे प्रमाण २२ .९८ % आहे.
तर ठेकेदार मंडळी आपले बिल वाढावे म्हणून क्वारंटाईन चे दिवस १४ पर्यंत ठेवतात. हा कालावधी कमी केला व रिपोर्ट २४ तासात मिळाले तर ब-या झालेल्या रूग्णांचेत प्रमाण वाढेल व अधिक क्वारंटाईन सेंटरची गरज भासणार नाही. उल्हासनगरच्या प्रत्यक्ष बाधितांची संख्या १९३२ आहे, इतर काही रूग्ण संशयित आहेत. आणि महत्वाची बाब म्हणजे तब्बल ४८० रूग्ण उल्हासनगरच्या बाहेर उपचार घेत आहेत किंवा क्वारंटाईन झाले आहेत.
उल्हासनगरच्या कोविड हाॅस्पिटलची क्षमता पाहता, ३९६ रूग्ण सामावून घेणे फार मोठी गोष्ट नाही. असे असताना रूग्णांना या हाॅस्पिटल मधून त्या हाॅस्पिटल मधे भटकावे लागते.याचे कारण खाजगी रूग्णालयांना कस्टमर ( विद्यमान आमदारांच्या भाषेत ) मिळवून देणे हेच असू शकते. नवनवीन सीसीसी उभारणे, यामागे ठेकेदार मंडळींना धंदा मिळवून देणे हाच उदात्त हेतू असावा.ज्या भांडार विभागातून हाॅस्पिटलचे बेड ,गाद्या,आदी सामान खरेदी केले जाते ते ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे नसते व किंमत मात्र वारेमाप असते साहित्य हलक्या दर्ज्याचे असते, या मागे एक रॅकेट कार्यरत असून फार मोठा भ्रष्टाचार होत आहे. हाॅस्पिटलमधे रूग्णांची होणारी लूटमार ,अतिरिक्त बील आकारणी, अनावश्यक असलेल्या महागड्या औषध इंजेक्शनचा मारा, यामागे मेडिकल इंडस्ट्री आहे, हे आता लपून राहिलेले नाही.कोरोना या संकटांवर मात करण्यापेक्षा या लुटारू टोळीचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. उल्हासनगरचे आयुक्त हे खरेखुरे डाॅक्टर असलेले आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांनी तपशिलात जाऊन यावर नियंत्रण ठेवले तर उल्हासनगर कोरोनामुक्त होण्यास हा महिना पुरेसा आहे. मात्र ठेकेदार लाॅबी व मेडिकल इंडस्ट्रीस कोरोना लवकर नियंत्रणात यावे असे अजिबात वाटत नाही. कोरोनाच्या नावाने व निमित्ताने होणारा हा वायरस लौकरच संपला पाहिजे.
दिलिप मालवणकर यांची प्रतिक्रिया :
कारण नसतांना आणि कोरोना सारख्या संकटसमयी वेगळ्या कामांच्या निविदा काढणं पालिका प्रशासनाला परवडणारं नाही.विशेतः आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.किमान थर्डपार्टी आँडीट करून मगच बिलं आदा करण्याचं आदेश द्यावेत.अशी अपेक्षा ज्येष्ठ समाज सेवक पत्रकार दिलिप मालवणकर यांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम