
अग्रवाल रुग्णालयात चार तास कोरोनाबाधित मृतदेह पॅक न करता उघड्यावर
- by Reporter
- Jul 23, 2020
- 442 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मृत्यूचे सर्टिफिकेट घेण्यासाठी भांडूप येथून आणण्यात आलेला एक कोरोनाबाधित मृतदेह, मुलुंड पश्चिमेला असलेल्या पालिकेच्या अग्रवाल हॉस्पिटलातील अपघात विभागाच्या जवळील मोकळ्या जागेत पॅक न करता सकाळी ९ वाजल्यापासून दूपारी १ वाजेपर्यंत
उघड्यावर ठेवलेला आढळून आल्याने मुलुंडमधील वाढत्या कोरोना रुग्णांचे प्रमाण बघता पालिका प्रशासन हलगर्जीपणे मृतदेहाला असे उघड्यावर ठेवून कोरोनाला आमंत्रण देत आहे का असा संतप्त सवाल या निमित्ताने या रुग्णालयात तपासणीसाठी येणारे नागरिकांनी विचारला आहे.
अग्रवाल हॉस्पिटलच्या तळमजल्याला प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अपघात विभागाच्या नजीकच्या मोकळ्या जागेत चारही बाजूने पडदे लावून कोरोनाबाधित मृतदेह ठेवण्यासाठी व तेथेच या मृतदेहाला प्लास्टिकच्या आवरणात घालण्याची सोय करण्यात आली आहे. जवळच असलेल्या अपघात विभागात किरकोळ तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा, रुग्णांचा सतत राबता असतो तसेच पालिकेचे कर्मचारी व डॉक्टरांचे देखील सततचे येणे-जाणे चालू असते. आज सकाळी भांडूप येथून मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी आणण्यात आलेला एक कोरोनाबाधित मृतदेह एका बाजूने खुला असलेल्या पडद्याच्या आड सकाळी ९ वाजल्यापासून चार तास पॅक न करता उघडा ठेवण्यात आला होता. प्लास्टिकच्या आवरणात पॅक न करता उघड्यावर कोरोनाबाधित मृतदेह ठेवून पालिका प्रशासन कोरोना संसर्गाला आमंत्रण देत असल्याचे बघून तेथे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी व तपासणीसाठी आलेल्या इतर रुग्णांनी अपघात विभागाच्या डॉक्टरांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी वार्डबॉयना मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात बंद करायला सांगितले असल्याचे सांगितले. वार्डबॉयकडे याबाबतीत डॉक्टरांनी विचारणा केली असता मृतदेह वजनाने जड असल्याने पॅकिंगसाठी अजून दोन जणांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
दरम्यान मुख्य वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्याने त्या कार्यालयातील उपस्थित डॉक्टर गुरुनाथ बर्गले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता 'पॅक न करता उघड्यावर कोरोनाबाधित मृतदेह ठेवल्याने कोरोनाची बाधा होत नसून ३ ते ४ दिवसांनी मृतदेह सडतो तेव्हाच कोरोनाची बाधा होते' असे सांगितले. डॉक्टरांच्या या बेजबाबदार उद्गाराबद्दल या सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथील वरिष्ठ डॉक्टर टिकोने यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते मीटिंगमध्ये असल्याने त्यांचा संपर्क होवू शकला नाही.
अखेर एक वाजता मृत ईसमाचे नातेवाईक आल्यानंतर दिड वाजता हा मृतदेह पॅकिंगसाठी घेण्यात आला.
रिपोर्टर