
कोव्हीडच्या माहितीपासून कल्याण-डोंबिवलीकर अनभिज्ञ
रुग्णांच्या विगतवारीसह हॉस्पिटल्सच्याही अपडेट्सची गरज
- by Reporter
- Jul 23, 2020
- 1817 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगपालिकेंतर्गत कोव्हीड - १९ वर उपचार करण्यासाठी अधिकृत मान्यता असलेल्या हॉस्पिटलमध्ये, तसेच क्वारांटाईन सेंटर्समध्ये रिक्त झालेल्या बेडचा तपशील रोजच्या रोज जाहीर केला जात नाही. जर रुग्णांची विगतवारी आणि क्वारांटाईन सेंटर्ससह हॉस्पिटल्सची अपडेट्स वेळच्यावेळी मिळाली तर संबंधितांची धावपळ होणार नाही व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तणावमुक्त राहतील, याकडे नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोव्हीड - १९ चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागासह खासगी डॉक्टर, त्यांच्या टीम, खासगी हॉस्पिटल्स, सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते अशी अफाट शक्ती पणाला लावली आहे. रोगाशी लढा देण्याकरिता संक्रमित झालेल्या रूग्णांसाठी पालिकेचे कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटल, हॉलिक्रॉस हॉस्पिटल, डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली जिमखाना, डोंबिवलीचे हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृह, भिवंडी (बायपास) येथे टाटा आमंत्रा, इत्यादी हॉस्पिटल्सची कोव्हीड सेंटर व क्वारांटाईन सेंटरची घोषणा केली.
महानगरपालिकेतर्फे रोज किती रुग्ण पॉझिटिव्ह झाले किंवा किती रुग्ण जिद्दिने मात करून बरे झाले व डिस्चार्ज घेऊन घरी गेले, किती मृत झाले, हा सर्व अहवाल सादर केला जातो, हे स्तुत्य आहे. तथापी प्रशासनाने या कोव्हीड हॉस्पिटल्स व क्वारंटाईन सेंटर्समध्ये उपलब्ध असलेले बेड्स व रिकामे झालेले बेड्स याबद्दल दररोज माहिती सादर केली तर नक्कीच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बेड उपलब्ध असलेली हॉस्पिटल्स किंवा क्वारंटाईन सेंटर्स शोधण्यासाठी धावपळ होणार नाही. माहिती वेळच्यावेळी मिळाल्यास वेळ वाया न जाता रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपट थांबून संबंधित रुग्णावर लवकर उपचार मिळतील, असेही नगरसेवक कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सदर माहिती रोजच्या रोज प्रसारीत केल्यास वैद्यकीय विभागाच्या कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल. त्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या सूचनांची दखल घेऊन सद्याच्या प्रचलित यंत्रणांमध्ये योग्य ती सुधारणा करावी, अशी मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
रिपोर्टर