
कोवीड रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी
केडीएमसी आयुक्तांचे आदेश
- by Reporter
- Jul 23, 2020
- 353 views
डोंबिवली (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोवीडचा दर्जा दिलेल्या रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधितांना दिले. रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणीबाबत तक्रारी येत असतात असा विषय महापौर विनिता राणे यांनी उपस्थितांसमोर मांडला होता.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोवीडचा दर्जा दिलेल्या रुग्णांलयांना भेडसावणा-या तक्रारीबाबत व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला , सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेता राहूल दामले, सभागृह नेता प्रकाश पेणकर तसेच आयएमए चे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत कोवीडच्या दर्जा दिलेल्या रुग्णालयाच्या संचालक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी विविध संघटनांचे डॉक्टर्स महापालिकेस देत असलेल्या निःशुल्क सेवेबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांचे आभार मानले.
सध्याच्या आपत्तकालिन परिस्थितीत सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असावा, त्याचप्रमाणे कोव्हिड रुग्णांना लागणारी Remdesivir Injection व Tocilizumab Injection या इंजेक्शनचा साठा पुरेशा स्वरुपात उपलब्ध ठेवावा, याबाबतही सदर बैठकीत चर्चा झाली. फॅमिली डॉक्टर कोव्हिड फायटर*, या महापालिका राबवत असलेल्या उपक्रमाला सर्व रुग्णालयांनी व्यापक प्रमाणावर प्रतिसाद दयावा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. याबरोबर कोवीड रुग्णालयांनी त्यांचे रुग्णालयात तापाचे दवाखाने सुरु करावेत,व संशयित रुग्णाची तेथेच अँटिजेन टेस्ट करून घ्यावी त्यामुळे परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना निदान तात्काळ होऊ शकेल आणि निदान उशिरा झाल्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत व कोव्हिडमुळे होणा-या मृत्यूदराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
कोव्हिड बाधित रुग्णांना लक्षणांनुसार बेड उपलबध होण्यासाठी Real Time Basis वर रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या समजणे आवश्यक आहे, यासाठी सर्व कोव्हिड रुग्णालयांनी *Hospital Bed Management System* *Software* मध्ये नियमित स्वरुपात नोंदी अदययावत कराव्यात, असे पालिका आयुक्तांनी यावेळी सांगीतले.महापालिकेने तज्ञ व अनुभवी डॉक्टरांचे सहकार्य घेऊन कोव्हिड टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. गुंतागुंतीच्या केसेसमध्ये सदर कोव्हिड टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन उपचार करणेबाबत आवाहन पालिका आयुक्त यांनी यावेळी केले.
रिपोर्टर