२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेवर संघर्ष समिती ठाम १८ गावांच्या संमतीपत्रासह ७ गावांचे विनंतीपत्र शासनाला सादर
- by Reporter
- Jul 22, 2020
- 1644 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. तथापी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आजही २७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेवर ठाम असून या समितीने 18 गावांच्या संमतीपत्रासह ७ गावांचे विनंतीपत्र शासनाला सादर केले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि ९ गावे महापालिकेतच राहतील याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगानेही केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या बदलानंतर महापालिकेत आता ११८ प्रभाग राहतील यावर राज्य निवडणूक आयोगाने शिककामोर्तब केले असून त्याप्रमाणे प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे महापालिकेने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे काम देखिल सुरू केले आहे. तर दुसरीकडे २७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी घेतलेल्या बैठकीत १८ गावांच्या स्वतंत्र नगरपरिदेचे स्वागत करण्यात आले. मुख्य उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे या बैठकीत आभार मानण्यात आले. या बैठकीला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्यासह डॉ. वंडार पाटील, गुलाबराव वझे, अर्जुनबुआ चौधरी, बळीराम तरे, विजय भाने, रंगनाथ ठाकूर, समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, गजानन मांगरूळकर, दत्ता वझे, आदी उपस्थित होते.
संघर्ष समिती २७ गावांवर ठाम असल्याने केडीएमसीत समाविष्ट करण्यात आलेली ९ गावेही वगळण्यात यावी, त्यासाठी हरकती नाही. पण १८ गावांचे संमतीपत्र व ९ गावांचे विनंतीपत्र जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना संमतीपत्र व विनंतीपत्र सादर करण्यात आले. विशेष म्हणजे मंगळवारी एका दिवसात १८ गावांची नगरपरिषद मान्य असल्याचे ८ हजार २ संमतीपत्रे व ९ पैकी ७ गावांचे विनंतीपत्र सादर झाले असून उर्वरित २ दिवस बाकी असल्याने अन्य २ गावांची संमतीपत्रेही सादर करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीने कळविले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळण्यात आलेल्या घेसर, हेदूटणे, उंबार्ली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे या १८ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषेवर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद स्थापन करण्याबाबतची प्राथमिक उद्घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. मात्र २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच २७ गावांपैकी आजदे, सांगाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा ही ९ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करून उर्वरित १८ गावांना वगळल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिपोर्टर