डायलिसिस रुग्णांनी जायचे कुठे ? एखाद्या तरी रुग्णालयात सुविधा द्या : रुग्णांच्या नातेवाईकांची केडीएमसीकडे मागणी

डोंबिवली (श्रीराम कांदू ) : सद्या कल्याण-डोंबिवली हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने सर्वच शासकीय यंत्रणा त्याच्याशी लढण्यासाठी उपाययोजना आणि सुविधा निर्माण करत आहे. मात्र अशा परिस्थितीत डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांनी जायचे कुठे, असा सवाल उपस्थित करत अशा रुग्णांसाठी एखाद्या तरी रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केडीएमसीकडे केली आहे. 
     
आज सर्वत्र कोरोनाचीच चर्चा केली जात आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने इथली बहुतांश हॉस्पिटल ही कोव्हीड रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये अशा रुग्णालयांचाही समावेश आहे ज्याठिकाणी नियमितपणे रुग्णांचे डायलिसिस केले जायचे. मात्र त्यांचेही कोव्हीड रुग्णालयात रुपांतर झाल्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्याठिकाणची डायलिसिस सुविधा बंद करण्यात आली आहे. परिणामी डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांची मोठी गैरसोया होत असून आम्ही करायचे काय ? सर्वच रुग्णालये पालिकेने कोव्हीड केल्याने आम्ही जायचे तरी कुठे ? असे संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारले जात आहेत. तर डायलिसिससाठी फिरत असताना एखादा निगेटीव्ह रुग्ण कोव्हीड पॉजिटीव्ह झाला तर त्याच्यासाठी कल्याणमध्ये एकाही रुग्णालयात सुविधा नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते, अशी माहिती एका रुग्णाचे नातेवाईक उल्हास जामदार यांनी दिली. 
     
या सर्व अडचणींचा विचार करता महापालिकेने कल्याणातील एखाद्या तरी रुग्णालयात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणीही त्यांनी इतर सर्व डायलिसीस रुग्णांच्यावतीने केली आहे. कोव्हीडशी लढण्यासाठी पालिका करत असलेल्या प्रयत्नांबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र त्याचवेळी डायलिसिस किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचाराची सुविधा बंद करणे अजिबात योग्य नाही. अशा गंभीर आजाराच्या रुग्णांचा महापालिका प्रशासनाने विचार करून तातडीने अशा रुग्णांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित पोस्ट