मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयातील असूविधांमुळे येथील कर्मचारी वर्ग हैराण

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड येथील पालिकेचे अग्रवाल रुग्णालय कोरोना रुग्ण हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असून या कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले सुरक्षा किट रोजच्या रोज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप येथील

कर्मचाऱ्यांनी केला आहे. रोजच्या रोज नवीन सुरक्षा किट मिळत नसल्यामुळे येथील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात असून यासंदर्भात रुग्णालय प्रशासनासोबत
चर्चा करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनासोबत एक मीटिंग उद्या सकाळी कर्मचाऱ्यांनी आयोजित केली आहे, असे कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीने सांगितले. 

मागील काही दिवसांपासून मुलुंड पश्चिमेला असलेल्या पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयातील कोरोना रुग्ण हाताळणार्या कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज नवीन सुरक्षा किट जसे की, हँडग्लोज, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, इत्यादी मिळत नसल्याने जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. तसेच येथील तळमजल्याला पडदे लावून कोरोना मृतदेह पॅकिंग केले जातात परंतु मृतदेह उचलल्यानंतर त्या परिसराचे निर्जन्तुकिकरण देखील केले जात नाही असा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान या रुग्णालयातील कामगार कर्मचारी विजय कुलकर्णी यांचे रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना कोरोणाची बाधा झाल्याने काल निधन झाल्याने येथील कर्मचारी वर्ग संतप्त झाला असून रुग्णालयातील असूविधांमुळे आमच्या जीवाला देखील धोका असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या निष्क्रियतेचा व हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलनाच्या पवित्रात असून त्यापूर्वी आम्ही प्रशासनाशी बोलून चर्चा करणार आहोत असे अग्रवाल रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीनी सांगितले.

दरम्यान अग्रवाल रुग्णालयाचे सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा खेडेकर यांच्याशी यासंदर्भात बोलणे केले असता त्यांनी सांगितले की, 'आवश्यक त्या सुरक्षा किट कर्मचाऱ्यांना वेळेवर देण्यात येत असून त्यात कोणतीही तडजोड केली जात नाही आहे. उद्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार असून प्रशासन नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या ऐकून घेवून सोडविल्या जातील'. 

संबंधित पोस्ट