
मुलुंड विधानसभा निवडणूक कार्यालय मागील सात महिन्यांपासून अंधारात ! विजेचे बिल भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय उदासीन
- by Reporter
- Jul 22, 2020
- 366 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड पूर्व येथील खंडोबा मंदिराजवळील मुलुंड विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालय गेल्या ७ महिन्यांपासून अंधारात असून या कार्यालयाने महावितरणचे साधारण साडे सहा लाखाचे विजेचे बिल अद्यापही भरले नाही आहे. विजेचे बिल भरले नसल्यामुळे सध्या येथील कार्यालयात अंधार असून संगणक, पंखे व लाइट्स बंद आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे करताना अडचण येत आहेत.
साडे सहा लाखाचे विजेचे बिल न भरल्याने महावितरणने मुलुंड विधानसभा निवडणूक कार्यालयाची वीज कापली असून गेल्या सात महिन्यांपासून हे कार्यालय अंधारात आहे. येथील कर्मचारी लाइट्स आणि पंख्याशिवाय बाहेरून येणाऱ्या उजेडात संगणक बंद असल्याने हातातील मोबाईलवर कार्यालयीन कामे करताना दिसत आहेत. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे व त्यामधील बारीक अक्षरांमुळे या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे, काहींना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच मोबाईलवर आठ तास कार्यालयीन कार्ये उरकावी लागत असल्याने मोबाईलची बॅटरी देखील कार्यालयीन वेळ संपायच्या आतच संपून जात असल्याने येथील सर्व कर्मचारी हैराण झाल्याचे दिसून येत आहे. कामे वेळेवर पूर्ण नाही केली तर वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागत असल्याने मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत डोळ्यांना ताण देत येथील कर्मचाऱ्यांना एकेक दिवस ढकलावा लागत आहे.
येथील वरिष्ठ निवडणूक अधिकारी सुधीर घोसाळकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्हाधिकारी कार्यालयाशी महावितरणचे बिल भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु रक्कम मोठी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागत आहे व त्यामुळे वेळ जात आहे. महावितरण बिल भरले की विजेचा प्रवाह सुरू करायला तयार आहे. वीज नाही आहे तरीही येथील कर्मचारी मोबाईलचा वापर करुन कार्यालयीन कामे करत आहेत त्यामुळे या कार्यालयाचे काम कोठेही अडले नाही आहे. सध्या निवडणुकीची कामे नाही आहेत, म्हणून जनतेचा वावर येथे होत नाही आहे परंतु निवडणूक पूर्व कामे चालू झाली तर मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांची येथे ये-जा होईल व तेव्हा मात्र वीजेशिवाय सरकारी कार्यालयीन कामे करणे अशक्य होऊन जाईल', असे सुधीर घोसाळकर यांनी पूढे सांगितले.
रिपोर्टर