जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी या आमदाराला कोरोनाची लागण!

आमदार दुर्राणी यांच्या संपर्कातील पाच व्यक्ती क्वॉरंटाईन ; इतरांचा शोध चालू

परभणी  (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना झाला आहे, या वृत्ताला परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दुर्राणी यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे.

सर्वांत प्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.उपचारानंतर या दोघांनीही कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, सध्या बाबाजानी दुर्राणी यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. दुर्राणी लवकरच कोरोनावर मात करून लोकहिताचं काम करण्यासाठी सज्ज होतील, असा विश्वास परभणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवार १७ जुलै रोजी संध्याकाळी पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी जात तपासणी केली होती. याच वेळी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय झाला होता.आमदार दुर्रानी यांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यानंतर केलेल्या रॅपिड अॅन्टीजन्ट तपासणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती डॉ.सुमंत वाघ यांनी दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कॉरन्टाईन करण्यात आले असून उर्वरित लोकांचा शोध चालू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्रानी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याने आता आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतल्या जात आहे. याबाबत आता पाच संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे समजत आहे.

संबंधित पोस्ट