त्या कोरोनाबाधिताच्या आसपास घुटमळणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही कोरोनाची लागण ?
- by Reporter
- Jul 17, 2020
- 1329 views
डोंबिवली (श्रीराम खंडू) : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून पसार झालेल्या त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा गेल्या गुरुवारी कोपर रोडवरील फुटपाथवर तडफडून मृत्यू झाला होता. मात्र ज्यावेळी हा तरुण तडफडत होता त्याचवेळी त्याच्या अवतीभवत २-४ भटकी कुत्री घुटमळत होती. एकीकडे त्या भटक्या कुत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र पॉज संस्था या प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत नसल्याचे सांगत नागरिकांनी भीती बाळगायचे कारण नसल्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून गुरुवारी सांयकाळच्या सुमारास पळून गेलेला कोरोनाबाधित तरुण कोपररोडला फुटपाथवर तडफडत होता. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. हा रुग्ण दोन तासाहून अधिक वेळ फुटपाथवर तडफत असल्याची माहिती त्यावेळी स्थानिकांनी दिली होती. त्यांनतर त्याचा मृत्यू झाला आणि दोन तासानंतर या व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने पालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
त्यांनतर पुन्हा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये सदर तरुण फुटपाथवर तडफडत होता त्यावेळी त्याच्या अवतीभवती ३-४ भटकी कुत्री घुटमळताना दिसत आहे. त्यातील एक कुत्रा बराच वेळ सदर तरुणाच्या शेजारी येऊन बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये त्या भटक्या कुत्र्यांपासून कोरोना फैलावण्याची भीती पसरली आहे. आता तर त्या भटक्या कुत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे आहे. मात्र पॉज संस्था या प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी निलेश भणगे यांनी भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी आवाहन केले आहे. तर दुसरीकडे विविध जनावरांना कोरोना झाल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे.
प्राण्यांमुळे कोरोना पसरत नाही !
प्राण्यांमुळे कोरोना पसरत नाही हे वेटर्नरी कौंसिलने लिहून दिलेले असूनही नागरिक विनाकारण घाबरले असल्याचे मत निलेश भणगे यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळात पोलीस अडवत असल्याने प्राण्यांचे दवाखाने आणि पेट शॉप पूर्णवेळ उघडत नाही. अशात आमच्या पॉज संस्थेने पुढाकार घेऊन कुत्रे आणि मांजरी ह्यांना खाद्य पुरवठा करण्याचे काम आजही पॉज संस्था करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले. तर लॉकडाउनच्या काळापासूनच संस्थेच्या हेल्प लाईनवर विविध प्रकारचे कॉल्स आजही येत आहेत. गेल्या महिन्यातच होमलॉक दरम्यान कल्याणमधील एनी सॅम्युएल ह्यांचा लॅब्राडोर कुत्रा मरण पावला. त्याच्या अंत्यसंस्कार आणि दफनविधीसाठी ते घराबाहेर पडूही शकत नव्हते. अशावेळी पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी स्वतः अंबुलन्समध्ये घेऊन गेले. आणि त्या डॉगची दफनविधी केला. त्यामुळे प्राण्यांच्यामुळे कोरोना पसरत नसल्याने नागरिकांनी अजिबात घाबरायचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर