
'जीवन गौरव मासिक' ऑनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर
- by Reporter
- Jul 14, 2020
- 1563 views
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असल्याने अनेक कार्यक्रम/उपक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. काही रद्द करण्यात आले असले तरीही दि.१ जुलै २०२० रोजी अहमदनगर शाखेचे सहसंपादक मा. देविदासजी बुधवंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून "शाळा वाट बघतेय" या विषयावर नि:शुल्क अॉनलाईन राज्यस्तरीय काव्यस्पर्धा जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व अहमदनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अॉनलाईन स्वरूपात घेण्यात आली.
दरम्यान मनामनात काव्य रूजावे हीच भावना घेऊन त्या अनुषंगाने ऑनलाईन संमेलन घ्यायचे ठरले आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कविता टंकलिखित मागवण्यात आल्या. त्याला प्रतिसाद देत अकोला, मुंबई, सोलापूर, लातूर, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी साहित्यात जीवन गौरव मासिकातर्फे घेतलेला हा उपक्रम खरोखरंच कौतुकास्पद आहे.
सहभागी कवींचा उत्साह ओसंडून वाहत होता. कविता म्हंटली की काही समीकरणं येतात, छंद वृत्त लय विषय आशय विचार अशा विविध निकषांवर गुणप्रभार मांडून परीक्षक हृदयमानव अशोक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या परीक्षणातून सुनील माथने, अकोला (प्रथम क्रमांक), प्रदीप बडदे, मुंबई (द्वितीय क्रमांक), आरती परजणे, अहमदनगर (तृतीय क्रमांक), हेमा विद्वत, सोलापूर (उत्तेजनार्थ)
अंगद भुरे, लातूर (उत्तेजनार्थ) अनुक्रमे विजेत्यांना पारितोषिक घोषीत केले.
स्पर्धेचा समारोप होईपर्यंत सर्व कवीवृंदांचा भरभरून अभिप्राय येत होता. अशाप्रकारे अतिशय सूत्रबद्ध आणि शिस्तप्रिय ऑनलाईन कार्यक्रमाची जबाबदारी गुलाबराजा फुलमाळी, अमोलभाऊ शिंदे व सुनील पवार या संयोजक मंडळींनी पार पाडली. प्रा. रामदास वाघमारे आणि डॉ. अशोक डोळस या मान्यवरांचे स्पर्धेसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. शेवटी विजेत्यांना सन्मानचिन्ह सुद्धा नि:शुल्क घरपोच पोस्टाने पाठविण्यात येईल असे आयोजक जीवन गौरव सहसंपादक रज्जाक शेख यांनी आवर्जून सांगीतले. अशा प्रकारे साहित्यात वाखाणण्याजोगी अशी उत्तम कामगीरी आयोजक रज्जाकभाई शेख यांनी बजावली.
रिपोर्टर