महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते`थँक यू कोविड योद्धा' अभियानाला प्रारंभ
आरोग्य सेवेतील कोविड योद्ध्यांना धन्यवाद देण्यासाठी ३१ मराठी कलावंत एकत्र
- by Reporter
- Jul 13, 2020
- 812 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोविड संकट काळात १२.४४ कोटी महाराष्ट्रवासियांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केलेले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, आरोग्यसेवक यांना धन्यवाद देण्यासाठी डॉ. ऐश्वर्या नायर यांच्या पुढाकाराने आणि रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने थँक यू कोविड योद्धा' (टीवायसीवाय) हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्या अंतर्गत मराठी सिनेसृष्टीतील ३१ कलावंत एकत्र आले आहेत. या अभियानाच्या ध्वनीचित्रफितीचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते भायखळा येथील महापौर निवासस्थानी करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, अभिनेते सुशांत शेलार, माध्यम सल्लागार राम कोंडिलकर, रवि नायर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे, आदित्य शिंदे उपस्थित होते.
सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले, सचिन खेडेकर, सुबोध भावे, शंकर महादेवन, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, पुष्कर जोग, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, शशांक केतकर, प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, सागर देशमुख, प्रथमेश परब, सई लोकर, वैभव तत्ववादी, प्रितम कांगणे आनंदा कारेकर, माधव देवचक्के, गौरीश चिपूरकर या कलाकारांनी कोविड विरोधातील थँक यू कोविड योद्धा या प्रकल्पात सहभाग दिला आहे. हे सर्व कलाकार लोकमान्य’ या चित्रपटातील `जीवन आपुले सार्थ करा रे’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला हे आवाहन करत आहेत. व्हिडिओपॅलेसचे नानिकभाई जयसिंगानी यांनीदेखील सामाजिक कार्यासाठी लोकमान्य चित्रपटातील गीत उपलब्ध करून दिले आहे.
नागरिकांना यात सहभागी होता येईल. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी समाजमाध्यमांवरील फेसबुक, ट्विटर, युट्युब, इन्स्टाग्रामवरील थँकयूकोविडयोद्धा वर अधिक माहिती मिळू शकेल तसेच इच्छुकांना या मदत निधीसाठी रामचंद्र प्रतिष्ठान, शामराव विठ्ठल सहकारी बँक, दादर शाखा खाते क्रमांक १०३१०३१३०००२६७३ (IFSC SVCB०००००३१ ) वर ९९ रुपयांपासून पुढे सहभाग देता येईल.

रिपोर्टर