
गणेश मंडळांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
- by Adarsh Maharashtra
- Jul 11, 2020
- 2136 views
मुंबई दि .११ जुलै मुंबईत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी ही ऑनलाईन पद्धतीने महापालिकेने काल पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केले आहे. १९ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, महानगर पालिकेने काही अटी व शर्ती श्री गणेश मंडळाना दिलेल्या आहेत. यासोबत श्री गणेश मंडळाने हमीपत्र ही देणे बंधनकारक केलेले आहे.
महापालिकेच्या हद्दीत साधारणतः १२ हजार छोटी-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन ‘एक खिडकी’ पद्धतीबाबत जाहीर आवाहन
गतवर्षाप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची ‘एक खिडकी’ (वन विंडो) कार्यपद्धती काल १० जुलै २०२० पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे आता मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. मंडळांकडून परवानगीसाठी आकारण्यात येणारे नाममात्र शुल्क रुपये १००/- हे यावर्षी ‘कोविड- १९’ साथ रोगाच्या परिस्थितीमुळे यावर्षापुरते कोणत्याही मंडळाकडून आकारण्यात येणार नाही. तसेच मंडळांकडे उपलब्ध असणारा अल्प कालावधी लक्षात घेता, गतवर्षी ज्या मंडळांना परवानगी दिली होती, त्या मंडळांचे अर्ज यावर्षी ऑनलाईन पद्धतीतच स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस शाखेकडे न पाठविता मागील वर्षीच्या परवानगीच्या आधारे त्वरित परवानगी देण्यात येईल. परंतु, त्यासाठी मागील वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये न चुकता नमूद करणे आवश्यक आहे.
अर्जदार विहित कालावधीत कुठूनही वा कधीही अर्ज करु शकतो. सदर ऑनलाईन सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करतानाची कार्यपद्धती – मनपा पोर्टलवरील > ऑनलाइन सेवा > परिरक्षण > गणपती / नवरात्रीच्या टॅबखालील Ganpati/Navratri Mandap Application मध्ये नमूद विविध लिंकनुसार अर्ज सादर करावा.
ऑनलाईन पद्धतीने मंडळांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) आहे. कोणतीही अडचणी असल्यास संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त यांचे संपर्क साधावा.
यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बाबींबाबत विशेष हमीपत्र मंडळांना देणे बंधनकारक आहे. ऑनलाईन प्रणालीतून हे हमीपत्र डाऊनलोड करावे, त्यावर संबंधीतांच्या स्वाक्षऱया करुन अपलोड करावे व अर्जासह सादर करावे.
श्री गणेशोत्सव २०२० साजरा करण्याच्या परवानगीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या हमीपत्रसाठी काही अटी व शर्ती पुढील प्रमाणे
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी यावर्षी स्थापित करण्यात येणाऱया मूर्तिची उंची ही ४ फूटापेक्षा अधिक असणार नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंडपाचे आकारमान हे कमीत-कमी ठेवावी. जेणेकरुन तेथे गर्दी होणार नाही.
सामाजिक अंतर (Social Distancing) च्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मंडपात वावरणारा प्रत्येक कार्यकर्ता / व्यक्ति यांना मास्क लावणे बंधनकारक असेल. तसेच मंडपात एकावेळी ५ पेक्षा कार्यकर्ते असणार नाहीत.
मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून ३ वेळा निर्जंतुकीकरण (Sanitization) करुन घेणे तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ति यांना वापरासाठी सॅनिटायझेशन उपलब्ध करुन देणे.
यावर्षी विशेष बाब म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे / फुले व हार अर्पण करणे या गोष्टींसाठी प्रतिबंध असावा.
गणेश मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर दरवर्षी जे फुले, हार, प्रसाद विक्रीचे तात्पुरते स्टॉल व टेबल लावले जातात. यासाठी यावर्षी प्रतिबंध असावा.
श्री गणेशाच्या आरतीच्यावेळी मंडपात एकावेळी जास्तीत-जास्त १० कार्यकर्त्यांना आरतीची संधी द्यावी.
सध्याच्या गंभीर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने बृहन्मुंबईत आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने मंडप सजावट / रोषणाई / देखावे यांना मुरड घालून २०२० चा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने लोकाभिमूख उपक्रम राबवून साजरा करावा. याप्रसंगी मंडळातर्फे जनजागरण / रक्तदान, आरोग्यतपासणी लोकोपयोगी आरोग्यभिमूख कार्यक्रमाचे आयोजन करुन महापालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
व्यावसायिक जाहिरातींना प्रतिबंध करुन साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा.
हार / फुले / प्लास्टिक इत्यादींचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याकडे लक्ष द्यावे.
ध्वनि प्रदूषाच्या अनुषंगाने विहित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन आजुबाजूला असलेल्या कोरोना बाधितांना व इतर रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सार्वजनिक मूतींचे विसर्जन मंडपा लगतच्या कृत्रिम तलावातच करावे.
गणेश मूर्तीच्या आगमन आणि विसर्जनप्रसंगी मूर्तीबरोबर मंडळाचे १० पेक्षा अधिक लोक असणार नाही तसेच कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.
बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
उत्सवप्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होण्यासारखी कोणतीही कृती करु नये. अन्यथा साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड विधान १८६० कायदा अन्वये कठोर कारवाई केली जाईल. या जाहीर आवाहनाचे आणि अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करुन पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे पालिका प्रशासनाने कळवले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम