वाढीव वीज बिलासंदर्भात आमदार मिहीर कोटेचा धावले ग्राहकांच्या मदतीला

मुलुंड  (शेखर चंद्रकांत भोसले) : महावितरणकडून आलेल्या भरमसाठ विजेच्या बिलामुळे तसेच बिलात महावितरणने घातलेल्या सावळा गोंधळामुळे हैराण झालेल्या मुलुंडमधील महावितरण ग्राहकांच्या तक्रारींकडे आमदार मिहीर कोटेचा यांनी विशेष लक्ष घातले असून विजेच्या बिलासंबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास मुलुंड पश्चिमेकडील एम जी रोडवरील आमदार कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

महावितरणने जून महिन्यांत मुलुंडमधील अनेक नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल पाठवली आहेत तसेच काही ग्राहकांनी गेल्या महिन्याचे विजेचे बिल भरलेले असूनही त्याची नोंद न घेता बिल भरले नाही असे दाखवून पुन्हा तेवढी अधिकची रक्कम या महिन्याच्या बिलात भरण्यासाठी पाठवले आहे आहे. काहींना सरासरी बिल पाठवले आहे तर काहींना चुकीच्या पद्धतीने बिल पाठवले आहे. तसेच दिलेल्या मुदतीत बिलाची रक्कम भरली नाही तर वीजप्रवाह खंडित केला जाईल अशी टांगती तलवार देखील ग्राहकांच्या डोक्यावर ठेवण्यात आली आहे. 

मोठ्या रक्कमेचे बिल आल्याने संतप्त झालेल्या मुलुंडच्या वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात चौकशी केली असता सरासरी बिल पाठविण्यात आले असून हे बिल तीन सुलभ हप्त्यात भरू शकता असे सांगून आलेल्या बिलात कुठलीही तडजोड केली जाणार नसून बिलासंबंधित इतर कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास महावितरणच्या लिंकवर जावून जाणून घ्यावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महावितरणच्या कार्यालयाकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांनी आमदार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात जावून बिलासंबंधीची आपली गार्हाणी त्यांच्यापूढे मांडली. आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांपर्यंत ग्राहकांच्या समस्या पोहचाव्यात यासाठी वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारात सुमारे ५०० नागरिकांनी सहभागी होवून आपल्या तक्रारी नोंदविल्या तसेच महावितरण अधिकाऱ्यांवर तक्रारींचा भडीमार केला. 

महावितरणने यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून आमदार मिहीर कोटेचा यांनी मात्र वीज ग्राहकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून ग्राहकांच्या वीज बिलात तफावत आढळून आल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, जोपर्यंत ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले जात नाही किंवा वाढीव बिलाबाबत काही गैरसमज असतील तर ते दूर केले जात नाही तोपर्यंत त्यांचा वीजप्रवाह खंडित करु दिला जाणार नाही, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सर्व वीज ग्राहकांना यानिमित्त आश्वासित केले आहे.

संबंधित पोस्ट