बाळासाहेब ठाकरे यांनी ‘एक शरद बाकी गारद’ हे म्हटलं होतं.त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल- खासदार संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘एक शरद बाकी गारद’ हे म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल, असा प्रतिटोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचे शीर्षक ‘एक शरद बाकी गारद’ असे असून याबाबतचा प्रोमो दोन दिवसांपूर्वीच शेअर केला होता. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी गारद’ ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं शीर्षक द्यायला हवं होतं, असा टोला लगावला होता. तसेच बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

याबाबत बोलताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबां सोबत काम करत होतो, असे ही यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट