केडीएमसीकडून शहरातील रस्त्यांवर औषध फवारणीला सुरुवात
- by Reporter
- Jul 10, 2020
- 583 views
डोंबिवली (श्रीराम खंडू) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असताना आता खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसीतर्फे शहरातील रस्त्यांवर जंतुनाशक औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान ही औषध फवारणी करताना दिसत आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनेक उपक्रम आणि उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेतले आहेत. त्यापैकी सार्वजनिक रस्त्यांवर जंतुनाशक औषधांच्या फवारणीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून ही संख्या नियंत्रित करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसमोर त्यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महापालिका प्रशासन आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता कल्याण-डोंबिवली शहरांतील सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा एकदा जंतुनाशक औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. शहरांतील प्रमुख चौक, नाके आणि रस्त्यांवर ही औषध फवारणी केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली.
रिपोर्टर