रुग्णवाहिन्यांसाठी खाजगी गाड्यांचा वापर
- by Reporter
- Jul 10, 2020
- 642 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिका वेळेवर ऊपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांना तासनतास तिष्ठत राहावे लागत आहे त्यामुळेच पालिका प्रशासनाने खाजगी वाहनांचा वापर कोविड रूग्णवाहिका म्हणून करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार पालिकेच्या एस आणि टी वार्डात या खाजगी गाड्यांचा वापर करुन रुग्णांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
पालिकेच्या झीरो मिशन अंतर्गत एस आणि टी वार्डात प्रत्येक घरात जावून रुग्णांची तपासणी केली जात आहे. तपासण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या वाढत्या रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही आहेत परिणामी अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिकेची संख्या वाढविणे जरूरीचे झाल्याने पालिकेने सुरुवातीला बेस्टच्या मिनी बसेसचा वापर रुग्णवाहिका म्हणून करण्यास सुरुवात केली तरीही रुग्णवाहिकेची कमतरता भासू लागल्याने खाजगी गाड्यांचा वापर रुग्णांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत असून अश्या प्रकारच्या ५ खाजगी गाडय़ा मुलुंडमध्ये कोविड रुग्णवाहिकासाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण, हायरिस्क कॉंटॅक्ट रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यासाठी या खाजगी गाडय़ा रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. याव्यतिरिक्त बेस्टच्या मिनी बसेस, मनपाच्या रुग्णवाहिका व १०१८ द्वारा ऊपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी ऊपलब्ध असणार आहेत. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे रुग्णांना आता रुग्णवाहिकासाठी अधिक वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिपोर्टर