अजितदादांनी राखला उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान, 'ते' नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

मुंबई (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले.

स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांची नाराजी ऐकली. त्यांना पारनेरचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिलं. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्न सुटणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर नगरसेवकांनी घरवापसी केली.

काय म्हणाले मिलिंद नार्वेकर...

'अजित दादांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्र्यांचा मान राखला. शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपच्या मार्गावर होते. पण अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं. याबाबत मी अजित पवार यांना भेटलो होतो. आता त्याच नगरसेवकांनी घरवापसी केली आहे.

संबंधित पोस्ट