भाजपचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण

केडगाव (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आज मंगळवार दि. 7 जुलै रोजी दिली.कुल त्यांच्या पुण्यातील घरी होम क्वारंटाइन झाले आहेत.

आमदार कुल हे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी दौंड येथे गेले होते.तेथे त्यांनी दौंड शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. तेव्हा तेथे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास खोकला येत होता. दरम्यान, आमदार कुल हे शुक्रवारी दि. 3 जुलै रोजी  दिल्लीला गेले होते. शनिवारी कुल यांना समजले की त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे.ही घटना समजल्याने कुल यांना धक्का बसला. कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कुल यांनी खबरदारी म्हणून 4, 5, 6 जुलै दरम्यान स्वतःला पुण्यात क्वारंटाइन केले. कुल यांनी सोमवार दि. 5 जुलै रोजी  स्वतःची कोरोना चाचणी केली. कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातील सर्व जण, त्यांचे स्वीय सहायक, चालक अशा आठ जणांची कोरोना चाचणी सोमवारी केली आहे.

आमदार कुल वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या कुल यांचे कुटुंबीय त्यांच्या राहू या गावी आहे. तर कुल हे पुण्यात होम क्वारंटाइन झाले असून ते घरीच सर्व उपचार घेणार आहेत. आमदार कुल यांनी त्यांच्याजवळील स्वीय सहायक, चालक या सर्वांना घरी पाठवून गेले दिले आहे. दरम्यान, राहू गावात पुढील आठ दिवसांसाठी जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट