
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुलुंडच्या कोरोना उपचारकेंद्राचे लोकार्पण.
- by Reporter
- Jul 07, 2020
- 638 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी आणि वांद्रे—कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना उपचार केंद्रांचे, मंगळवार दिनांक ७ जुलै २०२० रोजी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्र संवादाद्वारे (व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे) लोकार्पण केले. मुलुंड येथे सिडकोच्या वरिष्ठांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे या कोविड केंद्राचे हस्तांतरण केले.
मुलुंड पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या जागेवर सिडकोच्या पुढाकाराने १६५० बेडचे कोविड उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. मानव हस्तविरहित स्वयंचलीत असलेल्या हे कोविड उपचार केंद्र अत्याधुनिक वैद्यकिय सेवायुक्त आणि संपूर्ण वातानुकुलित असून यांत ९५२ बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत तर ५०० बेड हे ठाणे महानगर पालिकेसाठी राखुन ठेवण्यात येणार आहे.
एकूण सात अँगलमध्ये असलेल्या या कोविड उपचार केंद्रातील सहा अँगलमध्ये रूग्णांची सोय केलेली असुन सातव्या अँगलमध्ये कोविड उपचार केंद्राच्या कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ६ अँगल पैकी ३ अँगल मध्ये ऑक्सिजनयुक्त बेड असून इतर ३ अँगलमध्ये नॉन ऑक्सिजन बेड असणार आहेत. संशयित कोरोना रुग्णांना या ३ अँगलमध्ये
आयसोलेशनसाठी ठेवण्यात येईल. व्यवस्थापन कर्मचार्यांसाठी येथे अत्याधुनिक कार्यालय बनविण्यात आले आहे. तसेच पुरेसे वेंटीलेटर, क्ष किरण कक्ष, ईसीजी कक्ष, सीसीटिव्ही यंत्रणा, रूग्णांसाठी पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाण्याची आणि अॅक्वागार्ड मशीनची व्यवस्था सर्व अँगलमध्ये
करण्यात आली आहे. २६००० लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँक द्वारे साठा येथील ९५२ खाटांना ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे, मुलुंड उपनगरात सध्या कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढताहेत. याकाळात अश्या कोरोना आरोग्य केंद्राच्या लोकापर्णामुळे नागरिकांना त्याचा खूपच फायदा होणार असून मुलुंड व आजूबाजूच्या परिसरातील कोरोना रुग्णांची बेडसाठी होणारी धावाधाव यामुळे बंद होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर, सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, मुंबई महानगर पालिकेचे डिएमसी बालमवार, टि वाॅर्डचे सहायक आयुक्त किशोर गांधी, सहा. अभियंता सचिन नेहरे, कोविड उपचार केंद्राचे प्रमुख प्रदीप आंग्रे, उप अभियंता हेमंत भोये व इतर पालिकेचे आणि सिडकोचे अधिकारी, डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनस्थळी स्नेहा कॅटरर्सच्या संजय माळी यांनी विशेष मेहनत घेवून उपस्थितांच्या चहापाण्याची व्यवस्था केली होती. याप्रसंगी मुसळधार पाऊस पडत असल्याने व्हिडीओ काॅन्फरन्स मधील नेत्यांची भाषणे उद्धाटनस्थळी ऐकू येत नव्हते.
.........भाजपाचा असहकार.......
मात्र मुलुंड मधील इतक्या मोठ्या कोरोना आरोग्य केंंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमास भाजपाचे स्थानिक खासदार कोटक, आमदार मिहीर कोटेचा, भाजपा गटनेते व प्रभाग समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, नगरसेविका समिता कांबळे, रजनी केणी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे व नील सोमय्या गैरहजर होते. यावरून भाजपा व आघाडी सरकार मध्ये कोरोना संकटातही समन्वय नसल्याचे दिसुन आले.
रिपोर्टर