वीज बिलं परवडेना,वसई-विरार मध्ये शिवसैनिकांचं चड्डी बनियनवर आंदोलन

वसई (प्रतिनिधी) : करोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडली असतानाच, अवाच्या सवा दराने आलेल्या वीज देयकांमुळे महावितरणविरोधात सध्या राज्यभर तीव्र नाराजी पसरली आहे. वाढवी वीज बिलाची चर्चा सोशल नेटवर्किंगवरही सुरु आहे. अनेकांना नेहमीपेक्षा तिप्पट बिल आलं आहे.

वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे. “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं होतं.

विशेष म्हणजे महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असतानाही शिवसैनिकांनी हा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाठवली आहेत. मात्र, ही वीज बिले प्रमाणापेक्षा अधिक असल्याने ग्राहकांचा संताप वाढला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही, त्यात ही वीज बिले भरायची कुठून? असा सवाल सामान्यांमधून होत असतानाच वसई-विरारमधील शिवसैनिकांनी आज महावितरण कार्यालयावर चड्डी बनियन आंदोलन केलं.यावेळी ३० ते ४० शिवसैनिकांनी चड्डी बनियन घालून महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली आणि वाढीव बिलाबाबत जाब विचारला. लॉकडाऊनमुळे अंगावर केवळ चड्डी बनियन उरली आहे. तुमचे बील भरायचे कसे? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला. शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण, उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक, शाखाप्रमुखांनी वसई पश्चिमेकडील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले आणि महावितरणने जनतेच्या अंगावरील उरलेसुरले कपडे उतरवू नये अशी मागणी केली. तसेच वाढीव बिल रद्द करण्याचीही मागणी केली.

संबंधित पोस्ट