महाविकास फोडाफोडी? शिवसेनेचे ५ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 1833 views
नगर, ४ जुलै : महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल भेट घेतली होती. महाविकास आघाडीतल्या नाराजी बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काल पार पडली. लॉकडाऊन बाबत लोकांमध्ये नाराजी पसरल्याने आणि राज्य अधिकारीच चालवत असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याने काल बैठका देखील पार पडल्या.
लॉकडाऊन बाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यां मध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली.मात्र आज चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेड मध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. शरद पवार लंकेच्या कामावर समाधानी असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळेच, राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेतील फोडाफोडी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्य केल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटी पक्षाकडूनही दुर्लक्षितच राहिले आहेत. त्यामुळे पारनेरमधील या फोडा फोडीची शिवसेनेकडून दखल घेतली जाऊन राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होण्याचीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच लंके यांनी ही संधी साधली आणि पुढील निवडणुकीत पारनेर शहरातील एकहाती वर्चस्वचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम